रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना कोरोना चाचणी करण्यावरून शिवसेनेच्या दोन आमदारांमध्ये वेगवेगळी दोन मते आल्यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे. सिंधुदुर्गाचे पालक मंत्री असलेले उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज सकाळी सिधुदुर्गात बोलताना म्हटले आहे की, कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना rt-pcr आणि डोस बंधनकारक आहे. ज्यांचे rt-pcr आणि दोन डोस पूर्ण नसतील अशांची टेस्ट करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आलेल्या आहेत.


तर दुसरीकडे माजी मंत्री आणि विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव यांनी मुंबईतून येणाऱ्या चाकरमान्यांचे चाकरमान्यांना rt-pcr याची कोणतीही सक्ती करू नये, अशा प्रकारच्या सूचना आपण जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत. खुद्द भास्कर जाधव यांनी माध्यमांशी बोलताना असं सांगितलं. याउपर कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत असेल तर त्यांनी थेट मला संपर्क करावा, असं थेट आवाहन त्यांनी चाकरमान्यांना केलं आहे.  


Ganeshotsav 2021 : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफ, मंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा


एकाच पक्षातील दोन मोठ्या नेत्यांनी केलेल्या वेगवेगळ्या विधानांमुळे कोकणात जाणाऱ्या गणेशभक्त मोठ्या संभ्रमात आहेत. शिवाय कोकणात जाताना आता rt-pcr आणि दोन डोस नेमके आहे की नाही असा सवाल देखील गणेश भक्तांना पडला आहे. सध्या मुंबईसह इतर शहरातून कोकणात हजारो नागरीक जात आहेत. असे असताना लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारे वक्तव्य समोर येत असल्याने त्यांचा गोंधळ उडाला आहे. 


Ganeshotsav 2021 : गणेशोत्सव काळात नाईट कर्फ्यू लावण्यावर मुख्यमंत्री एक- दोन दिवसात निर्णय घेणार


जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार कोकणात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांकडे लसीचे दोन डोस झालेले सर्टिफिकेट किंवा 72 तास आधीची rt-pcr टेस्ट केल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.  ही कागदपत्रं असल्यास अशा प्रवाशांच्या तपासण्या गाव पातळीवर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकातद्वारे दिली आहे. त्यामुळे नक्की कुणाचं ऐकायचं असा सवाल सर्वसामान्य कोकणवासीयांना पडला आहे. सदरच्या गोष्टींमध्ये वरिष्ठ पातळीवरून तात्काळ योग्य त्या सूचना जारी करण्यात याव्यात अशी मागणी देखील आता प्रवासी वर्गातून होत आहे.