मुंबई : नालासोपाऱ्यात वैभव राऊतच्या घरात आढळलेल्या स्फोटकांमागे श्रीकांत पांगारकरची मोठी आर्थिक मदत होती, असा दावा एटीएसने केला आहे. त्यामुळे मुंबई सत्र न्यायालयाने पुढच्या चौकशीसाठी पांगारकरला 28 तारखेपर्यंत पोलिस कोठडीत पाठवलं आहे.


नालासोपाऱ्यात 20 हून अधिक स्फोटकं सापडल्यानं खळबळ उडाली होती. याप्रकरणी आधी वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर आणि शरद कळसकर या तिघांना केली आहे. त्यातील शरद कळसकर हा डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येतील शूटर असल्याचीही माहिती समोर येतेय. त्यानंतर काल एटीएसने जालन्याहून श्रीकांत पांगारकरला अटक केलीय.

एटीएसचे म्हणणे काय आहे?

“श्रीकांत पांगारकर याची नालासोपारा स्फोटक प्रकरणात फायनान्सर म्हणून महत्त्वाची भूमिका होती. त्यामुळे इतर आरोपींसोबतच पांगारकरची चौकशीही करणे गरजेचे आहे. या संपूर्ण प्रकरणाचं उद्दिष्ट काय होतं, मास्टारमाईंड कोण, ही माहिती मिळवायची आहे. पांगारकरने काही ठिकाणांची रेकी सुद्धा केली होती. त्याच्याकडून पेन ड्राईव्ह, हार्ड डिस्क आणि काही संशयित पुस्तके जप्त करण्यात आली आहेत.” असे एटीएसने कोर्टाला सांगितले.

कोण आहे श्रीकांत पांगारकर?

नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) जालन्यातून कट्टर हिंदूत्ववादी अशी ओळख असलेल्या श्रीकांत पांगारकरला अटक केली. जालना शहरातील महसूल कॉलनीमध्ये राहणारा श्रीकांत पांगारकर मूळचा शिवसेनेशी जोडलेला कार्यकर्ता होता. पक्ष कार्यकर्ता म्हणून ओळख असताना 2001 साली शिवसेनेने त्याला भाग्य नगर भागातून तिकीट दिलं, त्यावेळी तो या तिकिटावर निवडून आला.

यानंतर 2006 साली पुन्हा तो या भागातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आला. 2011 साली पक्षाशी फारसा सक्रिय नसल्याच्या कारणावरून त्याला पक्षाचं तिकीट देण्यात आलं नाही. या काळात त्याचा हिंदू जन जागृती संघटनेशी संबंध आला. यानंतर तो या संघटनेचा सक्रिय सदस्य म्हणूनच कार्यरत होता. आई, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा पांगारकरचा परिवार आहे.

पांगारकरशी सध्या शिवसेनेचा संबंध नाही : खोतकर

“श्रीकांत पांगारकरचा सध्या शिवसेनेशी संबंध नाही. दोनवेळा पांगारकर शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आला होता. तो आमचा नगरसेवक देखील होता. मात्र, 2011 ला शिवसेनेनं त्याला तिकीट नाकारले. तेव्हापासून पांगारकर शिवसेनेत सक्रिय नाही.” असे शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी स्पष्ट केले.

तसेच, तपास योग्य मार्गानं जाईलच, मात्र शिवसेना आणि श्रीकांत पांगारकरचा 2011 पासून काहीही संबंध नाही. तो शिवसेनेचा कार्यकर्ताही नाही, असे पुन्हा खोतकर यांनी नमूद केले.

प्रकरण काय आहे?

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने नालासोपाऱ्यातील वैभव राऊत या व्यक्तीच्या घरातून मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त केली. भांडारअळीत राहणाऱ्या वैभव राऊतच्या घरातून एटीएसने ही स्फोटकं जप्त केली. महत्त्वाचं म्हणजे वैभव राऊत हा कट्टर हिंदुत्ववादी सनातन संस्थेशी संलग्न आहे. एटीएसने गुरुवारी रात्री ही धडक कारवाई केली. या धाडीत 8 देशी बॉम्ब मिळाले. तर घरापासून काही अंतरावर असणाऱ्या त्याच्या दुकानात बॉम्ब बनविण्यासाठी लागणारी सामुग्रीही मिळाली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामध्ये गन पावडर आणि डिटोनेटर यांचा समावेश आहे. या सामुग्रीमध्ये 2 डझन पेक्षा जास्त देशी बॉम्ब बनविले जातात.

एटीएसला वैभव राऊतकडे स्फोटकं असल्याची टिप मिळाली होती. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून एटीएसने सापळा रचला होता. गुरुवारी रात्री खात्री करुन वैभव राऊतच्या घरी धाड टाकली असता, एटीएसला स्फोटकांचा साठा आढळला. पोलिसांनी वैभवाला ताब्यात घेऊन अधिक चौकशी सुरु केली आहे.

एटीएसने या कारवाईनंतर डॉग स्कॉड, फॉरेन्सिक टीम यांनाही बोलावून तपासणीही केली. गुरुवारी रात्रभर एटीएसच्या अधिकाऱ्यांनी वैभव राऊतच्या घरी सर्च ओपॅरेशन केलं. मिळालेले बॉम्ब, त्यासाठी लागणारी सामुग्री ही कुठून आणली, हे बॉम्ब कशासाठी बनविले जात होते, याचा सर्व तपास आता सुरु आहे.