मुंबई : संतोष परब हल्ला प्रकरणात अटकेची टांगती तलवार कायम असलेल्या नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या पुन्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे. आज जिल्हा प्रमुख न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांच्या समोर सुनावणी झाली. यावेळी दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद करण्यात आला.


दोन्ही बाजूंकडून वकिलांची मोठी फौज उभी करण्यात आली आहे. नितेश राणेंवर गुन्हा दाखल होऊन त्यांना नोटीस आल्यानंतर नितेश राणे नॉट रिचेबल आहेत. त्यांच्या वकिलांनी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी कोर्टात अर्ज केला आहे. त्यावर आज सुनावणी झाली. यावेळी दोन्ही बाजूच्या वकिलांनी कोर्टापुढे आपली बाजू मांडली.  


आज सुनावणीला सुरूवात झाल्यानंतर कोर्टाने सरकारी वकिलांना विचारलं की, जामीन अर्जाबाबत तुम्ही समाधानी आहात का?  यावर सरकारी वकिलांनी नाही असं उत्तर दिले. त्यानंतर नितेश राणे यांचे वकिल संग्राम देसाई यांनी नितेश राणे यांची बाजू मांडली. 


"नितेश राणे आणि आरोपी नंबर 6 सचिन सातपुते यांचं संभाषण पोलिसांनी हस्तगत केले आहे. सीडीआर प्राप्त झाला आहे. मग अजून काय हस्तगत करायचं आहे? असा युक्तिवाद संग्राम देसाईंनी केला. याबरोबरच सगळ्या फिर्यादीमध्ये कुठेही संदेश सावंत आणि नितेश राणे यांच्या दुष्मनीबाबत कुठेही उल्लेख नाही. संशयितांना घटना घडल्यानंतर अटक केली मग ते कुठे राहतात? त्यांचा पत्ता किंवा संशयीतांची नावे अद्याप पोलिसांनी उघड केली नाहीत. हे पहिल्यांदाच घडत आहे.  संशयितांची नावे एवढे दिवस गुप्त ठेवता मग नितेश राणे आणि संदेश सावंत यांना नोटीस बजावली हे तपास अधिकाऱ्याला मीडियाला सांगण्याची गरज काय? असा प्रश्न देसाई यांनी न्यायालयात उपस्थित केला. 


"मोबाईल जप्त करायचा आहे असं पोलिसांकडून सागितलं जात आहे. मग दोन दिवस चौकशीसाठी बोलावलं त्यावेळी मोबाईल का जप्त केले नाहीत? 24 आणि 25 डिसेंबर या दोन दिवशी नितेश राणे आणि संदेश सावंत यांची चौकशी पोलिसांनी केली, मग हे सगळं जाणूनबुजून केलं जातंय का? 24 डिसेंबर रोजी विधानसभेच्या पायऱ्यांवर जे काही घडलं, एका मंत्र्याला हिंवण्यात आलं आणि त्यानंतरच नितेश राणे यांना अटक करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. राग आणि द्वेष ठेऊनच नितेश राणे यांना अटक करण्याचा डाव आहे. सगळं सापडलेलं असताना आता आरोपींना समोरासमोर बसवून काय साध्य करायच आहे? असा युक्तीवाद संग्राम देसाई यांनी नितेश राणे यांच्या बाजूने केला.  


सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सरकारची बाजून मांडली. विशिष्ठ प्राण्यांचा आवाज काढला म्हणून सूड काढला असं म्हणणं चुकीचं आहे. पोलिसांविरोधात तुमची तक्रार नाही मग तुम्ही कोर्टाला काय दाखवत आहात? गाडीला मागून घडक देणे हे जाणूनबुजून केलेले कृत्य आहे. धडक दिलेली व्यक्ती धडक देऊन थांबली नाही तर फिर्यादिवर चाकूने वार करत आहे. या घटनेचं संपूर्ण फुटेज उपलब्ध आहे. फिर्यादीला जाणूनबुजून जखमी देखील केले आहे. मग हे करण्याचं कारण काय? ती अनोळखी माणसं आहेत मग ती फिर्यादीच्या हत्येचा प्रयत्न का करतील? हल्ला करणारा नितेश राणे आणि संदेश सावंत यांना कळवायला पाहिजे असं का म्हणतो? याचाच शोध पोलिसांनी केला आहे. निवडणुकीत दहशत रहावी यासाठी हे कृत्य केलं गेलंय, असा अरोप प्रदीप घरत यांनी केला. 


सरकारी वकील उद्या पन्हा आपली बाजून कोर्टासमोर मांडणार आहेत. उद्या दुपारी 2 वाजून 45 मिनिटांनी पुन्हा सुनावणी होणार आहे. 


महत्वाच्या बातम्या