सोलापूर : पतीच्या हातून दुध सांडल्याचं कारण देत त्याला घराबाहेर काढणाऱ्या पत्नीला सोलापूर दिवाणी न्यायालयानं दणका दिला आहे. पतीला घराबाहेर काढणाऱ्या मुख्याध्यापक पत्नीला 30 हजारांची अंतरीम पोटगी तर महिन्याला 2 हजारांची पोटगी देण्याचे आदेश आज कोर्टानं जारी केले आहेत. राज्यातच नव्हे तर देशातील ऐतिहासिक निर्णय मानला जात आहे.


2004 मध्ये या दोघांचा विवाह झाला होता. एका वधुवर मेळाव्यात दोघांचीही ओळख झाली होती. पतीची परिस्थिती हलाखीची असल्यानं पत्नीनं घातलेल्या जाचक अटी मान्य करत दोघंही लग्नबंधनात अडकले. मुख्याध्यापिका असलेली पत्नी पतीला घरातील सर्व कामे करायला लावत असे. तसंच पतीला पत्नीच्याच घरी राहावं लागत होतं. एक दिवस पतीच्या हातून दुध सांडल्यानं पत्नीनं चिडून पतीला घराबाहेर हाकललं.

या प्रकारानंतर पतीनं पत्नीची माफीही मागितली, पण चिडलेल्या पत्नीनं त्याला घरात घेण्यास नकार दिला. अखेर पतीनं कोर्टात धाव घेत हिंदू विवाह कलम 9 आणि 14 अन्वये पत्नीनं आपल्याला घरात घ्यावं आणि प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत पोटगी द्यावी अशी मागणी केली. सोलापूर दिवाणी न्यायालयानं याप्रकरणी पत्नीला 30 हजार रुपये अंतरिम पोटगी आणि 2 हजार रुपयांची दरमहा पोटगी देण्याची आदेश दिले आहेत.