बीड : बीडमध्ये डॉक्टर जोडप्याने अत्यंत अनोख्या पद्धतीने आपलं लग्न केलं. बोहल्यावर चढण्याआधी वऱ्हांड्यांचे मेडिकल चेकअप करुन, मगच हे जोडपं बोहल्यावर चढले. या अनोख्या लग्नाची सध्या संपूर्ण बीड जिल्ह्यात चर्चा आहे.

बाशिंग बांधून वधू आणि वर मंडपात आले, मात्र त्यांनी थेट मंडपात न जाता शेजारीच एक शामियाना उभारुन वऱ्हाडी मंडळीचं मोफत मेडिकल चेकअप करण्यास सुरुवात केलं. हा प्रकार पाहून सुरुवातील वऱ्हाडी गोंधळली, नंतर कळल्यावर मात्र सर्व वऱ्हाड्यांनी मेडिकल चेकअप करुन घेतले.

डॉ. रोहिणी जाधव असे नवरी मुलीचे, तर डॉ. योगेश पडोळ असे नवऱ्या मुलाचे नाव आहे.

जाधव कुटंबात एकूण बारा डॉक्टर्स आहेत. म्हणूनच आपल्या व्यवसायातून समाजाची बांधिलकी या कुटुंबांने जपली आहे. लग्न सोहळ्यात चक्क एखादं मेडिकल कॅम्प अवतरावं, असेच चित्र या ठिकाणी पाहायला मिळत होते. कारण मेडिकल चेकअपनंतर आवश्यक प्राथमिक औषधंही देण्यात येत होती.

डॉ. रोहिणी जाधव यांचे वडील अंबादास जाधव यांना डॉक्टर होऊन गरिबांची सेवा करायची होती. मात्र घरच्या आर्थिक स्थितीमुळे डॉक्टर होता आलं नाही. मात्र आपल्या मुलांना तितके शिकवून डॉक्टर केले. गरिबांना अधिकाधिक सुविधा मिळाव्यात असे त्यांना कायम वाटत आले आहे. त्यांच्या मुलीने स्वत:च्या लग्नात मेडिकल कॅम्पसारखा उपक्रम राबवून अंबादास जाधव यांना अभिमान वाटेल, असे काम केले आहे.

आपले लग्न इतरांच्या लक्षात राहावे म्हणून अनेकजण नाना शक्कल लढवत असतात. मात्र जाधव कुटुंबीयांनी मुलीचं लग्न हटके केलंच, पण त्यासोबत त्यात सामाजिक जबाबदारीची किनारही दिसली. सामाजिक बांधिलकी जोपसलेल्या या लग्नसोहळ्याची सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चा होत आहे.