औरंगाबाद : दोन गटांमध्ये झालेल्या वादात औरंगाबाद शहरात जाळपोळ झाली आणि यामुळे मोठं नुकसान झालं. जाळपोळ आणि दगडफेकीत दोन नागरिकांचा मृत्यू झाला, तर काही पोलीस कर्मचारीही जखमी झाले. औरंगाबाद शहरातील सिटी चौक पोलीस स्टेशनचे एसीपी गोवर्धन कोळेकर यात गंभीर जखमी झाले आहेत.


गोवर्धन कोळेकर यांच्यावर औरंगाबादेतील सिग्मा रुग्णालयात उपचार सुरु असून ते आयसीयूमध्ये आहेत. जमावाला पांगवण्यासाठी ते स्वतः पुढे गेले तेव्हा एक दगड त्यांच्या गळ्याला लागला. ज्यामुळे त्यांच्या स्वरयंत्राला गंभीर दुखापत झाल्याची माहिती औरंगाबादचे प्रभारी पोलीस आयुक्त आणि पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांनी दिली.

कोण आहेत गोवर्धन कोळेकर?

गोवर्धन कोळेकर सध्या औरंगाबादेतील सिटी चौक पोलीस स्टेशनचे एसीपी आहेत. जीगरबाज अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. भीमा-कोरेगाव हिंसाचाराचे पडसाद जेव्हा औरंगाबादमध्ये उमटले, तेव्हा जमावाला पांगवण्यासाठी कोळेकर स्वतः पुढे गेले होते. त्यावेळी झालेल्या दगडफेकीतही त्यांना एक दगड लागला होता.

आतापर्यंत 50 जण ताब्यात

जाळपोळ आणि दगडफेक करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई सुरुच आहे. पोलिसांनी आतापर्यंत 50 जणांना ताब्यात घेतलं असून अजूनही चौकशी सुरुच आहे. त्यामुळे येत्या काळात आणखी कारवाई होणार आहे.

औरंगाबादेत मोतीकारंजा परिसरात काही किरकोळ कारणांवरुन दोन गटात वाद झाले. या वादात दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक करत जाळपोळ केली. दुकानांबाहेरील कूलर, गाड्यांची तोडफोडही करण्यात आली. राजा बाजार भागात जवळपास 25 दुकाने जाळण्यात आली. या घटनेत 30 ते 40 जण जखमी झाले.

पोलिसांच्या गाड्यांचाही जाळपोळ, दहा पोलीस जखमी

यात पोलिसांच्या तीन गाड्या जाळण्यात आल्या. सहाय्यक पोलीस आयुक्तांसह दहा पोलीस जखमी झाले आहेत. दोन गटाने केलेल्या दगडफेकीत सहाय्यक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर, क्रांती चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक श्रीपाद परोपकारी यांच्यासह दहा पोलीस जखमी झाले. यातील कोळेकर आणि परोपकारी यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर इतर पोलिसांना घाटीत दाखल केले.

संबंधित बातम्या :

औरंगाबादमध्ये दोन गट भिडले, घरं आणि दुकांनांचं नुकसान


औरंगाबाद का धुमसलं? जाळपोळीची कारणं काय?