सातारा : सैराटमधील रक्ताळलेल्या ठशांनी मनावर खोल जखम केली, ज्यावर खपली धरण्याआधी साताऱ्यात 'सैराट'शी साम्य असणारी घटना घडली आहे. प्रेमविवाह केल्याने दाम्पत्यावर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात घडली आहे. सुदैवाने या हल्ल्यातून पती-पत्नीही दोघेही बचावले. तसंच दोन वर्षांचा मुलगा शेजारी गेल्याने तो सुखरुप आहे.
गजवडी गावातील विनायक कदम आणि उषा यांचा प्रेमविवाह झाला होता. कुटुंबीय आणि नातेवाईक यांचा विरोध झुगारुन त्यांनी चार वर्षांपूर्वी पळून जाऊन लग्न केलं होतं आणि साताऱ्याबाहेर राहत होते. त्यांना दोन वर्षांचा मुलगाही आहे.
यात्रेनिमित्त हे पती-पत्नी गावात आले होते. याची माहिती मिळल्यानंतर उषा यांच्या नातेवाईकांनी कुऱ्हाड आणि दांड्यांसह विनायक कदम यांच्या घरावर हल्ला केला.
मुलीचे कुटुंबीय येत असल्याचं समजताच त्यांनी घराचा पुढचा दरवाजा आतून लावला. परंतु हल्लेखोरांनी मागील दरवाजा तोडून घरात प्रवेश केला आणि विनायक-उषा यांच्यासह घरातील सगळ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. सुदैवाने हे दाम्पत्यांने तिथून कसाबसा शेताच्या दिशेने पळ काढला. मात्र हल्लेखोरांनी विनायकच्या कुटुंबीयांवर कुऱ्हाडीने वार करुन त्यांना जखमी केलं.
महत्त्वाची बाब म्हणजे आजीने दोन वर्षांच्या मुलाला बाहेर नेलं होतं, म्हणून त्याचा जीव वाचला.
घटनेची माहिती मिळताच पोलिस तिथे दाखल झाले आणि पुढील अनर्थ टळला. पोलिसांनी या प्रकरणी सहा जणांना अटक करुन गुन्हा दाखल केला आहे. शंकर कदम, अश्विन कदम, दिनकर कदम, नामदेव कदम, लता कदम, अनिता कदम अशी अटक केलेल्यांची नावं आहेत. तर यातील एक जण फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
या घटनेनंतर गजवडी भागात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.