पुणे :  उन्हाच्या काहिलीने बेजार झालेल्या नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. येत्या तीन ते चार दिवसांत बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भाग, निकोबार द्वीपसमूह आणि दक्षिण अंदमान बेटांवर मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

 

मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक असेलला कमी दाबाचा पट्टा बंगालच्या उपसागरात निर्माण झालं. आहे. त्यामुळे 16 ते 17 मे रोजी मान्सून अंदमानात दाखल होण्याचा अंदाज आहे, अशी माहिती पुणे वेधशाळेच्या संचालिका सुनीतादेवी यांनी दिली आहे.

 

मागील काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात वळवाचा पाऊस सुरु आहे. त्यामुळे मान्सून भारतात कधी दाखल होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे.

 

केरळमध्ये 28-30 दरम्यान मान्सूनची वर्दी

 

दरम्यान, खाजगी हवामान वेधशाळा स्कायमेटच्या अंदाजानुसार, मान्सून 28 ते 30 मे दरम्यान केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. साधारणपणे दरवर्षी 1 जूनच्या दरम्यान मान्सून केरळात दाखल होत असतो, मात्र यावेळी दोन ते तीन दिवस अगोदरच येण्याची शक्यता आहे.

 

मान्सून केरळात तुलनेने लवकर दाखल होणार असला तरी मुंबईत पोहोचायला मात्र नेहमीपेक्षा थोडा उशीर होण्याची शक्यता आहे. मुंबईत मान्सून 12 जूनच्या आसपास दाखल होईल, असंही भाकित स्कायमेटने वर्तवलंय. साधारणपणे मान्सून गोवा आणि महाराष्ट्रात 7 जूनच्या आसपास दाखल होतो.

 

यावर्षी सरकारी आयएमडी आणि खाजगी स्कायमेट या दोघांनीही सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवला आहे.