धुळे : ‘दात आहेत, तर चणे नाहीत आणि चणे आहेत तर दात नाही’ अशी परिस्थिती सध्या राज्यात झाली आहे. कमी पाऊस, बोंड अळीचा प्रादुर्भाव, त्यात दुष्काळाचं सावट यामुळे कापसाच्या उत्पादनात यंदा घट आहे. तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर कापसाची मागणी अधिक, पुरवठा कमी अशी स्थिती असल्याने यंदा कापसाला अर्थात पांढऱ्या सोन्याला सोन्याचा भाव आलाय.


धुळे जिल्ह्यातील साक्री कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी दुपारी लिलाव पद्धतीने खरेदी झालेल्या कापसाला 6600 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला, जो राज्यातील आतापर्यंतचा सर्वोच्च भाव असल्याचा दावा साक्री बाजार समितीच्या सभापतींनी केलाय.

साक्रीच्या बाजार समितीत पहिल्याच दिवशी किमान 300 टन कापसाची आवक अवघ्या दोनच तासात झाली होती. शेजारच्या मध्यप्रदेशात कापसाला 6100 रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा भाव मिळाला आहे.

महाराष्ट्रात कापसाला आतापर्यंत 5600 रुपये प्रति क्विंटलपर्यंतचाच भाव मिळाला आहे. मात्र साक्री बाजार समितीत कापसाला मिळालेला 6600 रुपयांचा दर हा सर्वाधिक असल्याचं बाजार समितीचं म्हणणं आहे. पांढऱ्या सोन्याच्या भावाची चकाकी ऐन सणासुदीच्या काळात चकाकल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आहे.

दरम्यान, पावसामुळे यंदा कापसाच्या उत्पादनावर मोठा परिणाम झालाय. अनेक शेतकऱ्यांचा तर खर्च निघणंही कठिण आहे. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची मागणी अधिक असल्याने दर वाढले आहेत. त्यामुळे ‘दात आहेत, तर चणे नाहीत आणि चणे आहेत तर दात नाही’ अशी परिस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे.