बार्शी : हौसेला मोल नाही असे म्हणतात, त्यामुळे कोण काय करेल ते सांगता येणार नाही. आवड, प्रसिद्धी आणि लौकिकासाठी लोक काहीही करीत असतात. बार्शी येथील एका युवकाने चक्क सोन्याचा मास्क तयार करून घेतला आहे. कोरोनासारख्या जीवघेण्या व्हायरसने संबंध जगाला वेठीस धरलं आहे. या संकटाशी दोन हात करण्यासाठी अनेकजण लढा देत आहेत. पण या संकटातही काही लोकांना प्रसिद्धीचा असलेला सोस पाहायला मिळतो.


कोरोनाच्या संकटकाळात स्वतःच्या रक्षणसाठी मास्क घालणं अनिर्वाय असल्याचं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. मास्क न घातलेल्यांवर दंडही आकारण्यात येत आहे. परंतु, कोरोनाच्या प्रादुर्भावात मास्कच्या माध्यमातून होणाऱ्या चमकोगिरीची संपूर्ण शहरात चर्चा होताना दिसत आहे. हौस आणि प्रसिद्धीसाठी लोकं काय करतील याचा काहीच नेम नाही. अशातच लॉकडाऊनमुळे अर्थचक्र मंदावली असून प्रत्येकाच्याच खिशाला चाप बसला आहे. अशातही बार्शीतील या बहाद्दराने कोरोनापासून बचाव करण्यासाठी चक्क 5 तोळ्यांचा सोन्याचा मास्क तयार
करून घेतला आहे. आपत्तीतही मास्कच्या माध्यमातून होणाऱ्या चमकोगिरीची चर्चा शहरात होत आहे. सागर जानराव असं या बार्शीतील व्यक्तीचे नाव असून, त्याने पाच तोळ्यांचा सोन्याचा मास्क तयार करून घेतला आहे.


पाहा व्हिडीओ : कोरोनाकाळातही प्रसिद्धीचा सोस, बार्शीतील तरुणाने बनवून घेतला सोन्याचा मास्क



बार्शी येथील चांदमल ज्वेलर्स या दुकानातून हा मास्क तयार करुन घेतला आहे. या मास्कची अंदाजे किंमत दोन लाख चाळीस हजार एवढी आहे. सागर जानराव या तरुणाला सोनं वापरण्याची आवड आहे. जवळपास 1 किलो सोनं ते दररोज वापरतात. सागर यांचा हॉटेल तसेच रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे. हौस म्हणून आधीपासून सोनं वापरतो. त्यामुळे मित्रांनी कल्पना सुचवली की, सोन्याचा मास्क तयार करून घेता येईल. कल्पना आवडली आणि मास्क तयार करून घेतला, अशी प्रतिक्रिया सागर जानराव यांने दिली.


दरम्यान, यााधीही अनेकांनी सोन्याचा मास्क तयार करून घेतल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. कोल्हापूर, पुणे, पंपरी-चिंचवड या शहरांतही अनेकांनी सोन्याचा मास्क तयार करून घेतला होता. पुण्यात गोल्डमॅन म्हणून ओळख असणाऱ्या रमेश वांजळे यांनी पुरुषांसाठी सोन्याच्या दागिन्यांची फॅशन आणली आणि त्यानंतर शहरात अनेक गोल्डमॅन उदयास आले. पिंपरी चिंचवडचे शंकर कुऱ्हाडे यांनीही सोन्याचा मास्क बनवला होता. साडे पाच तोळ्याच्या या मास्कसाठी तब्बल दोन लाख 90 हजार रुपये खर्च केले होते. कोरोनाच्या महामरातीत अनेकांनी बनवलेल्या या सोन्याच्या मास्कमुळे अनेक उलट-सुलट चर्चा सुरु आहेत.