सांगली : संचारबंदीत अत्यावश्यक सेवेचा गैरवापर करुन मुंबईतून सांगलीत आणलेल्या तरुणीला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. 16 एप्रिल रोजी या तरुणीला तिच्या भावासह मुंबईहून शिराळा तालुक्यातील निगडी खुर्द गावात आणले होते. पोलिसांनी या प्रकरणी कोरोनाग्रस्त रुग्णासह पाच जणांविरोधात शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान या तरुणीच्या भावाचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे.


निगडी येथील प्रदीप पाटील यांनी आपल्या चुलतीला कॅन्सरच्या उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात अॅडमिट करण्यासाठी सांगली पोलीस अधीक्षक यांच्याकडे ऑनलाईन पासची मागणी केली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी प्रदीप पाटील, गणपती भालेकर आणि वाहन चालक संतोष साळुंखे यांना पास दिले होते. 16 एप्रिल रोजी त्यांनी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये चुलतीला पोहोचवले आणि गावी परतत असताना, मुंबईत असणाऱ्या निगडी गावातील तरुणी आणि तिच्या भावाला संचारबंदीतही आपल्या गाडीतून घेऊन आले.


यानंतर गुरुवारी मुंबईहून आलेल्या तरुणीची कोरोनाची लक्षणे आढळल्याने तिला आणि तिच्या भावाला इस्लामपूरमध्ये क्वॉरन्टाईन करुन त्यांची स्वॅब टेस्ट घेण्यात आली होती. 24 एप्रिल रोजी तरुणीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. यानंतर प्रशासनाची धावपळ उडाली. दोघा बहीण-भावांना मिरजेच्या कोरोना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.



मात्र संचारबंदीमुळे जिल्ह्यात प्रवेश बंद असताना, बहिण-भाऊ हे दोघे मुंबईवरुन गावात पोहोचले कसे? हा मोठा प्रश्न उपस्थित झाला होता. यानंतर पोलिसांनी तपास केला असता प्रदीप पाटील, गणपती भालेराव यांच्या गाडीतून ते मुंबईहून परत आल्याचे समोर आले आहे. यानंतर पोलिसांनी गणपती भालेराव, चालक संतोष साळुंखे, प्रदीप पाटील यांच्यासह कोरोनाग्रस्त तरुणी आणि तिचा भाऊ अशा पाच जणांविरोधात कलम 188, 269, 270, 34, राष्ट्रीय अपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 (ब) आणि कोविड 19 उपाय 2020 कलम 11 याप्रमाणे शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.


तर कोरोनाबाधित कुटुंबासह 11 जणांना क्वॉरन्टाईन करण्यात आले आहे. त्याचबरोबर निगडी खुर्द हे गाव सील करण्यात आल्याचे जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा यांनी सांगितले आहे.


Coronavirus | अत्यावश्यक सेवेचा गैरवापर करुन मुंबईहून सांगलीला आलेल्या मुलीला कोरोनाची लागण