नाशिक : राज्यात काही रेशन दुकानदारांनी गडबड केली असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्याबाबत सरकारने कारवाई केली आहे. आम्ही अशा काळाबाजार करणाऱ्या दुकानदारांवर आम्ही कारवाई करत आहोत. मात्र काही ठिकाणी दुकानदारांना मारहाण करण्याचे प्रकार घडलेत. दुकानदारांना मारहान करणे चुकीचे आहे. मारहाणीच्या घटना थांबल्या नाही तर रेशन दुकानांना पोलीस संरक्षण देण्यात येईल. याबाबत महसूल अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. आज भुजबळ यांनी नाशिकमधून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.


यावेळी ते म्हणाले की, राज्यात रेशन दुकानदारांविरोधात 19 एप्रिलपर्यंत 39 गुन्हे दाखल झालेत. अनेक दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. राज्यात 14 हजार तक्रारी आल्या असून 8 ते 9 हजार तक्रारी निकाली काढल्या आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या दुकानं सुरु करण्याच्या निर्णयाचं स्वागच देखील केलं. अर्थव्यवस्था सुरू झाली पाहिजे. केंद्राने दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला तो स्वागतार्ह आहे, असं ते म्हणाले. 100 टक्के सगळीकडे दुकानं सुरू होईल असं शक्य नाही. धोकादायक भागात दुकानं सुरू होणार नाहीत, असंही त्यांनी सांगितलं.

 साडेतीन लाख टन अन्न धान्य पोहोचवले

यावेळी भुजबळ यांनी सांगितलं की, राज्यातील साडेबारा कोटी लोकांपैकी साडेसात कोटी लोकांना साडेतीन लाख टन अन्न धान्य पोहोचवले आहे. केंद्राचा मोफत तांदूळ 95 टक्के लोकांना दिला आहे. केसरी कार्डधारकांना 3 कोटी लोकांना कमी दरात तांदूळ गहू वाटप सुरू केले, असेही त्यांनी सांगितले. मुंबई, औरंगाबाद, नागपूर , अमरावती विभागात केसरी कार्डधारकांना अन्न धान्य वाटप सुरू केले आहे. नशिकमध्ये 1 मे नंतर तर पुणे ग्रामीण मध्ये 26 एप्रिल नंतर देणार आहोत, असं ते म्हणाले. भारत सरकारकडून डाळ येत आहे. डाळीचे वाटप लवकर केलं जाईल असं ते म्हणाले. एरवी 3 लाख टन धान्य वाटप करत आलो मात्र आता 9 लाख टन धान्य वाटप होणार असल्याचं ते म्हणाले.