सांगली : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क लावणे, ग्लोव्ज घालणे आणि सॅनिटायजरचा वापर करणं गरजेचं आहे. कोरोनासारख्या मोठ्या संकटाला सामोरे जाताना सामान्य माणसासमोर ढाल बनून उभे आहेत ते पोलीस. सांगलीत ड्युटी बजावणाऱ्या या वीर पोलिसांसाठी इथल्या महिलांनी दोन लेअर असलेले दहा हजार कॉटन मास्क शिवून दिले आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. त्यामुळे लोकांनी घराबाहेर पडू नये, लोकांच्या सुरक्षिततेसाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून पोलीस बांधव सर्वजण 24 तास बंदोबस्त करत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव गेले काही दिवस वाढत चालला आहे. बाजारात मास्कची टंचाई भासू लागली आहे. जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांनाही टंचाई भासत होती. याशिवाय उन्हामुळे जे साधे मास्क पोलिसांकडे आहेत, त्यामुळे पोलिसांना सुरक्षितता कमी त्रास जास्त होत आहे.

कित्येक चेकनाक्यांवर नाकाला रुमाल बांधून काम करणाऱ्या पोलिसांना पाहून सांगलीच्या श्रुती दांडेकर यांनी त्यांच्यासाठी काहीतरी करायचे ठरवले. दहा हजार मास्कची गरज आहे कळल्यावर या कामात मदत घ्यायला लागणार हे लक्षात आलं. त्यांनी निलिमा वझे यांच्याशी संपर्क साधला आणि अगदी तासाभरातच 25 ते 30 महिलांनी मदतीचा हात दिला. विशेष म्हणजे सोशल डिस्टन्सिंग पाळत 15 ते 65 वयोगटातील या सर्व महिलांनी लाॅकडाउनच्या काळातील आपले वाढलेले काम सांभाळून केवळ आठ दिवसात दहा हजार उत्तम प्रतीचे मास्क शिवले.

हे मास्क दोन लेअरचे असून उन्हात हे मास्क घातले तर श्वास घेण्यास त्रास देखील होत नाही. हे सर्व मास्क धुवून त्याचा पुनर्वापर करता येतील असे आहेत. त्यामुळे कित्येक महिने पोलिसांना हे मास्क वापरता येणार आहेत. हे सर्व मास्क सांगली जिल्ह्याच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलं आहे.