मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यापाठोपाठ वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही आंबेडकर जयंती आणि फुले जयंती घरातच साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. याशिवाय विधानपरिषदेचे सदस्य प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी आंबेडकर जयंती घरातच कुटुंबासोबतसोबत साजरी करण्याची विनंती केली आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी हे आवाहन करण्यात आलं आहे.


प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "11 एप्रिलला महात्मा फुलेंची जयंती आहे आणि 14 एप्रिलला आंबेडकर जयंती आहे. दरवर्षी दोन्ही जयंती एकत्रित साजरी केली जाते. यावर्षी कोरोना व्हायरसने भारतासह जगाला भेडसावलं आहे. त्यामुळे लोक चिंतीत आहे. कोरोना व्हायरसला रोखायचं असेल तर अंतर ठेवून वागायचं. मी सर्व फुले, शाहू, आंबेडकरी जनतेला आवाहन करतो, यंदा जयंती घरातच साजरी करावी. जयंती कशी साजरी केली याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करुन सांगा. परंतु महात्मा फुले आणि बाबासाहेबांची जयंती सार्वत्रिक होणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे."


संविधान, ज्ञानाचा दिवा लावून आंबेडकर आणि फुले जयंती साजरी करा : शरद पवार


जयंती घरातच साजर करुन कोरोनापासून देशाला वाचवा : प्रा.जोगेंद्र कवाडे



14 एप्रिल रोजी आपल्या घरावर रोषणाई करा, दिवे लावा मात्र, सार्वजनिक ठिकाणी काही कार्यक्रम करु नका, असं सांगत पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष  प्रा.जोगेंद्र कवाडे यांनीही कोरोनाच्या महामारीमुळे आंबेडकर जयंती घरातच साजरी करण्याचं आवाहन केलं.  ते म्हणाले की, "कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढाईसाठी बाबासाहेब आंबेडकरांचा विचार सोबत घेऊन 14 एप्रिल रोजी सार्वजनिकरित्या जयंती साजरी न करता, आपापल्या घरीच साजरी करावी आणि आपल्या देशाला कोरोनाच्या महामारीपासून वाचवावं अशी आग्रहाची विनंती करतो."





संविधान, ज्ञानाचा दिवा लावून आंबेडकर आणि फुले जयंती साजरी करा : शरद पवार
'एक दिवा ज्ञानाचा' लावून फुले जयंती आणि 'एक दिवा संविधानासाठी' लावून आंबेडकर जयंती साजरी करा, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. "येत्या काही दिवसात शब ए बारात, महात्मा फुले जयंती आणि आंबेडकर जयंती आहे. परंतु यंदा जयंती उत्सवात गर्दी करु नका असं आवाहन शरद पवार यांनी केवं आहे. ते म्हणाले की, "आज महावीर जयंती आहे. मला खात्री आहे की संबंधित नागरिक कोरोनाची परिस्थिती पाहून आपल्या कुटुंबासह घरातच भगवान महावीरांबद्दल आदर व्यक्त करत असतील. असाच कार्यक्रम 8 एप्रिलला होणार आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे की यंदाच्या शब ए बारातला तुम्ही घरातच थांबा. हयात नसलेल्यांना घरातच स्मरण करा. त्यानंतर 11 एप्रिलला महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी आपल्याला ज्ञानाचा संदेश दिला. त्यामुळे यंदा फुलेंची जयंती ही 'एक दिवा ज्ञानाचा' लावून साजरी करा. 14 एप्रिलला बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. यावर्षी आपण 'एक दिवस संविधानासाठी' लावून जयंती साजरी करुया," असं शरद पवार म्हणाले.



कोरोनाचा मुकाबला केल्यानंतरच आंबेडकर जयंती साजरी करा : रामदास आठवले
तर कोरोनाचा मुकाबला केल्यानंतरच आंबेडकर जयंती साजरी करा असं आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. ते म्हणाले की, " कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी येत्या 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन केलं आहे. कोरोना हा साथीचा रोग गर्दीतून अधिक पसरतो. त्यामुळे आता सार्वजनिक उत्सव साजरे करण्याची ही वेळ नाही. कोरोना या महामारीविरुद्ध लढण्याची ही वेळ आहे. त्यामुळे यावर्षी 14 एप्रिल रोजी येणारी आंबेडकर जयंती घरी थांबूनच साजरी करुया. कोरोनाविरुद्धचा मुकाबला जिंकल्यानंतर 14 एप्रिलनंतर आपण आंबेडकर जयंती साजरी करुया. त्या आधी कोरोनाविरुद्धचं युद्ध जिंकण्याचा संकल्प करा; संयम ठेऊन घरीच थांबा."


Coronavirus | महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरी साजरी करा : प्रकाश आंबेडकर