मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यांत 15 दिवसांसाठी संचार बंदीची घोषणा केली. बुधवारी म्हणजेच, आज रात्री 8 वाजल्यापासून राज्यात 144 कलम लागू करण्यात आलं आहे. असून पुढील 15 दिवसांसाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याला 'ब्रेक द चेन' असं नाव देण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील नागरिकांना अनेक महत्वाचे प्रश्न पडले आहेत. यात सर्वात महत्वाचं म्हणजे राज्यात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी पासची गरज आहे की नाही? तर या प्रश्नाचं उत्तर 'नाही' असं आहे.


राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबत आज पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, राज्यात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी पासची गरज नाही. मात्र जर पोलिसांनी याबाबत विचारणा केली तर कारण मात्र सांगावं लागणार आहे.  


पोलिस महासंचालक म्हणाले की, या काळात अनेक दुकान बंद राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहे. परिस्थिति कठिण आहे. लोक जर बाहेर निघत असतील तर त्यांना आधी विचारलं जावं. विनाकारण मारहाण किंवा चार्ज लावू नये असे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत, असं त्यांनी सांगितलं. 


Maharashtra Lockdown: महत्वाची बातमी! एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी पासची गरज नाही, मात्र... 


ते म्हणाले की, जर कुणी कायद्याची पायमल्ली करत असेल. सार्वजनिक संपत्तीची नासधुस करत असेल तर कायद्याप्रमाणे कारवाई होणार. आमची विनंती आहे की, आपण आपली स्वतःची काळजी घ्या. मास्क घाला. पोलिस आपल्या बरोबर आहेत.  


पोलिस महासंचालक संजय पांडे म्हणाले की, जवळपास 81% पोलिसांचं कोविड लसीकरण झालं आहे. पोलिस पूर्णपणे सज्ज आहेत. 13000 होमगार्ड आमच्यासोबत आहेत. SRFP च्या 2 तुकड्या देखील तैनात करण्यात आल्या आहेत.  


पांडे यांनी सांगितलं की, आपत्कालीन कामासाठी जर कुणी बाहेर पडलं असेल तर त्यांना विनाकारण पोलिसांकडून त्रास दिला जाणार नाही.  जनहितासाठी सरकारनं लॉकडाऊनसारखं पाऊल उचललं आहे, असं पांडे यांनी सांगितलं. त्यांनी म्हटलं की, वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळं आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढला आहे.