नांदेड: काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात पंधरा दिवसांची संचारबंदी जाहीर केली त्याचवेळी गरीबांसाठी काही मदत पॅकेजही जाहीर केलं. मात्र सरकारच्या मदतीपासून काही हातावर पोट असणारा घटक मात्र अजूनही वंचित आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येचा पाश्वभूमीवर सरकारने लॉकडाउनची घोषणा केलीय. परंतु या सततच्या लॉकडाऊनमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेची नाडी समजल्या जाणाऱ्या बारा बलुतेदारांवर मात्र उपासमारीची वेळ आली आहे.
ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेची चाके ही साळी, कोळी, चांभार, माळी, कुंभार, सुतार, वडार अशा बारा बलुतेदारांवर चालतात. परंतु या सततच्या लॉकडाऊनमुळे ही ग्रामीण अर्थव्यवस्थेची चाके सध्या रुतून बसली आहेत. या बारा बलुतेदारांची सरकार दरबारी कोणतीही नोंद नसल्यामुळे यांच्या माध्यमातून होणारी आर्थिक उलढालीची कुठेही नोंद होत नाही. परंतु कोरोनाच्या या दुष्टचक्राचा मोठा परिणाम या ग्रामीण अर्थव्यवस्थेतील कणा समजल्या जाणाऱ्या या बारा बलुतेदारांवर झाला आहे.
या बारा बलुतेदारांपैकी एक असणाऱ्या चर्मकार व्यावसायिकांवर सध्या उपासमारीची वेळ ओढवली आहे. लॉकडाऊन अगोदर मोठ्या प्रमाणात लग्नसमारंभ, सण, उत्सवासाठी बूट, चप्पल यासह इतर चामड्याच्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री होऊनआर्थिक उलाढाल होत असे.त सेच यांच्याकडून बनवण्यात येणाऱ्या विविध चामड्याच्या बूट, चप्पल यांची बाहेर राज्यात निर्यात होत असे. पण लॉकडाऊनमुळे ही निर्यात बंद होऊन लाखों रुपयांचा माल घरात धूळखात पडून आहे.
तसेच वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे सरकारने लग्नसमारंभ, सण उत्सवावर निर्बंध घातले. त्यामुळे खरेदी विक्री बंद होऊन यांची आर्थिक घडी आता विस्कटलीय. सण ,उत्सव, लग्नसमारंभाच्या वेळेस ग्रामीण व शहरी भागात यांच्याकडून मोठी आर्थिक उलाढाल होते. परंतु त्यावर ही सरकारने बंदी घातल्यामुळे आता केलेला खर्च, किराया, लाईट बिल यासह पोट भरणे देखील आता अवघड झाले असल्याचं बारा बलुतेदार बांधव सांगत आहेत.
नाभिक समाजाचा सरकारला इशारा
आमच्यासाठी दोन दिवसात पॅकेज जाहीर करा अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा महाराष्ट्रातील नाभिक समाजाने दिलाय. आज कोल्हापुरातील नाभिक समाजाने एबीपी माझाकडे ही भूमिका मांडली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये नाभिक समाजाचा विचार केला नाही. त्यामुळे नियम घालून द्या, त्यानुसार दुकानं चालू ठेवतो अशी विनंती करण्यात आलीय. जर सरकारने आमचा विचार केला नाही तर हजारो कामगारांवर उपासमारीची वेळ येईल, असंही नाभिक समाजाने बोलून दाखवलं आहे.
पूजा साहित्य विक्रेते, फुल विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ
राज्यभरात आज रात्री पासून लॉकडाऊन सुरु होणार असल्याने गोदा काठावर असणारे पूजा साहित्य विक्रेते, फुल विक्रेते यांची दुकानंही बंद होणार असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. सरकारने तुटपुंजी मदत जाहीर केलीय, त्यामुळे लॉकडाऊन लागू न करता सरकारने निर्बंध कडक करावे अन्यथा दुकाने सुरू करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी व्यावसायिक करत आहेत.