Dhananjay Munde : महाराष्ट्रातले जवळपास डझनभर मंत्री आणि त्यापेक्षा जास्त आमदार कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेत. मात्र सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी कोणताही धडा घेतलेला दिसत नाही. कारण काल (मंगलवारी) एका कार्यक्रमात धनंजय मुंडेंनी कोरोनाचे सगळे नियम मोडल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं आहे. काल धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी राजाभाऊ फड यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश झाला. यावेळी कुणाच्याही चेहऱ्यावर मास्क दिसत नव्हता. विशेष म्हणजे स्वतः धनंजय मुंडेंनी देखील मास्क घातला नव्हता. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सगळ्यांना नियम काटेकोरपणे पार पाडा, असं आवाहन करतात. मात्र त्यांचेच नेते नियम धाब्यावर बसवताना पाहायला मिळत आहेत.


धनंजय मुंडे यांनी स्वतः आपल्या ट्विटर हँडलवरुन फोटो ट्वीट केले आहेत. ट्वीट करताना धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे की, "परळीतील जनक्रांती संघटनेचे युवक नेते  राजाभाऊ फड यांनी त्यांच्या असंख्य समर्थक कार्यकर्त्यांसह आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा इतका प्रचंड उत्साह आणि गर्दी होती की मलाही त्यांच्यासोबत  सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही. सर्वांचे स्वागत." 



दरम्यान, काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या राज्याच्या हिवाळी अधिवेशना दरम्यान ठाकरे सरकारमधील अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना सरकारमधील मंत्री देखील कोरोनाच्या विळख्यात सापडताना दिसत आहेत. बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, प्राजक्त तनपुरे, एकनाथ शिंदे, के.सी पाडवी, यशोमती ठाकूर या मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. अशातच, राज्य सरकारमधले मंत्रीच कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानं कॅबिनेटची बैठक पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाविकास आघाडीचे मंत्री कोरोनाबाधित आहेत. त्यामुळे आता कॅबिनेटची बैठक पुढच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. 


राज्यातील लॉकडाऊनबाबतचा निर्णय आज


राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आज महाराष्ट्रातील लॉकडाऊनच्या भवितव्याचा निर्णय होणार आहे. राज्यातल्या कोरोनाच्या परिस्थितीवर आणि लावण्यात येणाऱ्या निर्बंधांवर आज सकाळी नऊ वाजता बैठक होणार आहे. या बैठकीतला निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कळवण्यात येईल. त्यानंतरच मुख्यमंत्री राज्यात कठोर निर्बंध जाहीर करण्याची दाट शक्यता आहे. 


राज्यात कोरोनाचे संकट अधिक गडद होत असून मंगळवारी कोरोनाच्या तब्बल 18 हजारांहून अधिक दैनंदिन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राज्य पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या दिशेने चाललं आहे की, काय अशी शंका उपस्थित होत आहे. राज्यात सध्या तरी लॉकडाऊन लावण्यात येणार नसून निर्बंध कडक करण्यात येतील, असं आरोग्यमंत्र्यांनी जरी स्पष्ट केलं असलं तरी कोरोनाची वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला आहे. याच मुद्द्यावर मंगळवारी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत मंत्रालयामध्ये एक महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीनंतर अंतिम निर्णयासाठी मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.