Sindhutai Sapkal : अनाथांची माय अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचं काल रात्री पुण्यातल्या गॅलक्सी रूग्णालयात निधन झालं. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील गॅलक्सी रूग्णालयात सिंधुताईंवर उपचार सुरू होते. सामाजिक अत्याचारांना बळी पडलेल्या सिंधुताईंनी महाराष्ट्रात अनाथाश्रम स्थापन केलेत. त्यांना अन्न, शिक्षण आणि निवारा उपलब्ध करुन दिला. 'अनाथांची माय' असलेल्या सिंधुताई यांच्या जाण्यानं त्यांची लेकरं पोरकी झाली असून संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहेत. सिंधुताई सपकाळ यांच्यावर आज दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
सामाजिक कार्यकर्त्या आणि अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sakpal Passes Away) यांचं निधन झाले आहे. वयाच्या 75 व्या वर्षी पुण्यात अखेरचा श्वास घेतला आहे. आपल्या कार्याचा ठसा जनमानसात उमटवणाऱ्या व्यक्तींमध्ये सिंधुताई सपकाळ यांचे नाव आदराने घेतले जाते.
सिंधुताई सपकाळ यांच्यावर पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरु होते. काही दिवसांपूर्वीच सिंधुताई यांच्यावर गॅलेक्सी रुग्णालयातच हर्नियाचे ऑपरेशन करण्यात आले. त्यानंतर सिंधुताई यांना पुन्हा एकदा गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात होते. सिंधुताई सपकाळ यांच्यावर उद्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.
पाहा व्हिडीओ : 'पोरांपेक्षा गाईंची मला चिंता, तीचं देणं परत करायला हवं'
सिंधुताईनां लोक प्रेमाने माई म्हणत असंत. सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सिंधुताई सपकाळ यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1947 रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला. नको असताना मुलगी झाली म्हणून तिचे नाव चिंधी ठेवले. वर्धा जिल्ह्यातील जंगल भागातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी. बुद्धिमान असल्या तरी जेमतेम मराठी शाळेत चौथीपर्यंत शिकता आले.
अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली. 1994 साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरु झाली. आपली कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले आणि त्यांनी इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला. येथे लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाते. त्यांच्या भोजन, कपडे अन्य सुविधा यांची उपलब्धता संस्थेकडून केली जाते. शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होतील यासाठीही त्यांना मार्गदर्शन दिले जाते. आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक युवतींना योग्य जोडीदार शोधून देणे आणि त्यांच्या विवाहाचे आयोजन करणे हे कार्यही संस्थेकडूनच केले जाते.
अनेक निराधारांच्या आयुष्यातील मायेची सावली हरपली : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाबद्दल भावना व्यक्त करत म्हणाले,"सिंधुताईंच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. आईच्या ममतेनं हजारो अनाथांचा सांभाळ करणारी ती मातृदेवताच होती. त्यांच्या अचानक जाण्यानं समाजसेवेतील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यातून हरपले आहे. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या समाजजीवनात आपल्या कामाने आदर्श निर्माण करणारी, अनेक निराधारांच्या आयुष्यातील मायेची सावली हरपली आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताईंना भावपूर्ण श्रद्धांजली".
सिंधुताईंच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्राची मोठी हानी : उपमुख्यमंत्री
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील श्रद्धांजली वाहिली आहे. ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधनामुळे समाजातील अनाथांच्या डोक्यावर मायेचे मातृछत्र धरणारी माय हरपली आहे. समाजातील हजारो अनाथ मुला-मुलींचा सांभाळ करुन त्यांच्यावर मायेची पखरण करणाऱ्या सिंधुताईंच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिंधुताईंना श्रद्धांजली वाहिली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Sindhutai Sapkal : 'नकुशी' असणारी चिंधी ते अनाथांच्या आयुष्याचं सोनं करणारी माय; असा होता सिंधुताई सपकाळांचा जीवनप्रवास
- अनाथांची माय सिंधुताई सपकाळ काळाच्या पडद्याआड, 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
- Sindhutai Sapkal : एका युगाचा अंत! अनाथांसाठी आयुष्य झिजवणाऱ्या सिंधुताईंचा 750 हून अधिक पुरस्काराने सन्मान
- Sindhutai Sapkal : 'अनेक निराधारांच्या आयुष्यातील मायेची सावली हरपली', सिंधुताईंच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह