Corona Virus राज्यात साधारण वर्षभरापूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सक्तीच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. साधारण वर्षभराच्या नियम आणि निर्बंधांनंतर राज्यात अखेर अनेक नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली. टप्प्याटप्प्यानं देण्यात आलेल्या या शिथिलतेमध्ये समावेश होता दुकानांच्या वेळा, उपहारगृह सुरु करण्याची मुभा आणि अखेर निर्धारित वेळांमध्ये सर्वसामान्यांसाठी लोकलच्या प्रवासाची मुभा. तिथं लोकल सेवा सुरु करण्याबाबतचा निर्णय ठाकरे सरकारनं दिला आणि इथं अनेक कार्यालयं पुन्हा सुरु करण्यात आली. पण, आता मात्र वर्क फ्रॉम होम, या सुविधेलाच प्राधान्य देत शक्य त्या परिनं संपर्क टाळा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलं आहे.


राज्यातील जनतेला कोरोनाच्या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. यामध्ये त्यांनी अधोरेखित केलेली एक बाब म्हणजे कार्यालयीन वेळांची विभागणी.


राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांना काही दिवस बंदी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या निती आयोगाच्या बैठकीत आपण काही सूचना केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. ऑफिसच्या वेळा विभागणे हा त्यातील महत्त्वाचा मुद्दा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दिवसाच्या 24 तासांचा उपयोग योग्य पद्धतीनं करत वेळेची विभागणी करण्यावर त्यांनी भर दिला.


ऑफिसमध्ये येण्याची आवश्यकता नाही त्यांना वर्क फ्रॉम होम द्या...


संपर्क टाळण्यासाठी ज्यांना ऑफिसमध्ये येण्याची आवश्यकता नाही त्यांना वर्क फ्रॉम होम ही सुविधा देण्यासाठी मुख्यमंत्री आग्रही दिसले. त्यातही तुकड्या करत ऑफिसमधील विभागांमध्ये ही सुविधा सोयीनुसार देण्याचा सल्ला त्यांनी दिला. सोबतच रेल्वे, खाण्याची ठिकाणं आणि इतरही काही ठिकाणांवर कारण नसताना होणारी गर्दी टाळण्याचा मुद्दा उचलून धरला.


वर्क फ्रॉम होममध्येही ऑफिसच्या वेळांची विभागणी करत त्यांनी ‘मी जबाबदार’ ही मोहिम राज्यातील नागरिकांना हाती घेण्याचं आवाहन केलं.


कार्यालयीन वेळांची 10 ते 5 ही मानसिकता बदलण्याची गरज : मुख्यमंत्री


मी जबाबदार! ही एक नवी मोहिम राबवूया. घराबाहेर पडताना मास्क वापरणं, सॅनिटायझर वापरणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं, कार्यालयीन वेळा बदलणं या साऱ्याचा यात समावेश, असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी पुढील काही दिवस कोरोना लढ्यातील अतिशय महत्त्वाचे दिवस ठरणार आहेत हा इशारा जनतेला दिला.