मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे (Pune), पिंपरी चिंचवड (Pimpari Chinchwad) मधील शाळा, महाविद्यालयं बंद करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. सोबतच आज रात्री 12 वाजेपासून मुंबई, नवी मुंबई, पुणे, नागपूर (Nagpu), पिंपरी चिंचवडमध्ये जिम, सिनेमा हॉल, जलतरण केंद्र बंद करण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. कोरोना व्हायरसचा फैलाव होऊ नये यासाठी लोकांनी अनावश्यक प्रवास आणि गर्दी टाळली पाहिजे असं आवाहन यावेळी उद्धव ठाकरे यांनी केलं. कोरोनाबाबत घेतलेले निर्णय आज मध्यरात्रीपासून लागू केले जाणार आहेत. तसंच खासगी कंपन्यांना शक्य आहे तिथे सर्व कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याची परवानगी द्यावी, असंही ते म्हणाले.


यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, परीक्षा उशिरा घेण्यासंबंधी विचार केला जात आहे असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. दहावी आणि बारावीची परीक्षा वगळता पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील शाळा पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. उगाच भीतीचं वातावरण निर्माण होऊ नये यासाठी मुंबईत असा निर्णय घेण्यात आलेला नाही. खासगी शाळा काही ठिकाणी स्वत:हून बंद करत आहेत. लोकांच्या मनात भीती निर्माण होऊ नये ही आपली जबाबदारी आहे, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

#CoronaVirus | सॅनिटायझरचा तुटवडा, मुंबईत गेल्या पंधरा दिवसांत आठपट मागणी वाढली 

जिम, नाट्यगृहे, चित्रपटगृहे, जलतरण तलाव बंद 

यावेळी ठाकरे यांनी सांगितलं की, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर येथील जिम, नाट्यगृहे, चित्रपटगृहे, जलतरण तलाव बंद ठेवण्यात येणार असून मध्यरात्रीपासून या आदेशाची अंमलबजावणी होणार आहे. मॉल्स, रेस्तराँ, हॉटेल आपण बंद करणार नाही मात्र तिथे जाणं लोकांनी टाळावं, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.

मॉल्स आणि हॉटेल सुरु राहणार मात्र गर्दी टाळावी
राज्यात व्यायामशाळा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, जलतरण तलाव बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे आणि बस या अत्यावश्यक सेवा देखील सुरु राहतील. तसेच महानगरांमधील मॉल्स आणि हॉटेल सुरु राहणार आहेत. मात्र, नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. नागरिकांनी भिती न बाळगता आवश्यक ती खबरदारी बाळगावी. सामूहिक कार्यक्रमांमध्ये गर्दी करणे टाळावे. मॉल्स, हॉटेल सुरु असले तरी तेथे जाणे टाळल्यास अनावश्यक गर्दी होणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

राज्यात सुदैवाने अजून 17 ही रुग्णांमध्ये गंभीर लक्षणं दिसत नाहीत. आपण दक्षता घेतली तर पुढील धोका टाळू शकतो, असं यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले. ते म्हणाले की, रेल्वे आणि बस अत्यावश्यक सेवा असल्याने बंद करु शकत नाही. तसंच धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय तसंच क्रीडा स्पर्धा घेण्यात येऊ नयेत. अशा कार्यक्रमांसाठी सरकारकडून परवानगी दिली जाणार नाही. परवानगी दिली असेल तर ती रद्द केली जाईल.

#CoronaVirus | महाराष्ट्रातील रुग्णांमध्ये तीव्र लक्षणे नाहीत, अधिकची काळजी घ्या : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

विषाणूची उत्पत्ती स्थानिक नाही

मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण आढळले मात्र त्यांच्यात आढळून आलेली नाही. त्यामुळे या विषाणूची तीव्रता कमी झाली असेल तर समाधानाची बाब आहे. मात्र या विषाणूची उत्पत्ती स्थानिक नाही. परदेशी गेलेल्या पर्यटकांच्या माध्यमातून त्याचा फैलाव झाला आहे. कालपासून राज्यात तपासणी अधिक तीव्र करण्यात आली असून विविध देशांच्या दुतावासांशी देखील चर्चा केली जात आहे.

शासकीय कार्यक्रम रद्द करा

यात्रा, सामूदायिक कार्यक्रम, मोहिमा, शासकीय कार्यक्रम पूर्णपणे रद्द करा. लोकांना प्रशिक्षित करा. कोरोनाच्या संशयित रुग्णांची ओळख, त्यांचे विलगीकरण या बाबींवर भर द्यावा. शहरातील पर्यटन कंपन्यांना पुढील काही दिवस बुकींग न करण्याच्या सूचना द्या. सार्वजनिक स्वच्छतागृह, सार्वजनिक जागा येथे स्वच्छता ठेवा. जे या सूचनांचे पालन करणार नाही त्यांच्यावर कठोर कारवाई करा.