उस्मानाबाद : राज्यातील शासकीय मेगाभरतीची तारीख निश्चित झाली आहे. एबीपी माझाने राज्यातील शासकीय विभागांमधील जवळपास दोन लाख पदं रिक्त असल्याची बातमी दाखवली होती. त्यानंतर महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने नोकरभरतीचा  मुहूर्त ठरवला आहे. येत्या 15 एप्रिलपर्यंत खाजगी एजन्सी नियुक्त करुन 20 एप्रिलपासून मेगाभरतीला सुरुवात होण्याची शक्यता आहे.


थेट जनतेशी संबंधित गृह, सार्वजनिक आरोग्य, सामाजिक न्याय, जलसंपदा, कृषी व पशुसंवर्धन, महसूल व वने, महिला व बालविकास या विभागांमध्ये सर्वाधिक रिक्त पदे आहेत. प्रशासकीय विभागांमधील रिक्त पदांची संख्या आता दोन लाखांवर पोहोचली आहे. माहितीच्या अधिकारात संकलित झालेली माहिती एबीपी माझाने सर्वात आधी प्रसारित केली. त्यानंतर प्रशासनामध्ये हालचाली सुरु झाल्या आहेत. यासाठी एक लाख एक हजार पदांची आरक्षण पडताळणीही पूर्ण करण्यात आली आहे.


महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने महापरीक्षा पोर्टल बंद करुन खासगी एजन्सीमार्फत परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महाआयटी विभागाच्या माध्यमातून सर्व प्रक्रिया युद्धपातळीवर पूर्ण केली जात आहे. महाआयटी विभागातर्फे दोन दिवसात आरएसपी (रिक्वेस्ट ऑफ प्रपोजल) प्रसिद्ध केली जाणार असून देशातील एका सक्षम अशा एजन्सीकडून प्रस्ताव मागवले जाणार आहेत.


राज्य सरकारच्या निर्देशानुसार 15 एप्रिलपर्यंत राज्यातील शासकीय मेगाभरतीसाठी एक एजन्सी नियुक्ती केली जाणार आहे. राज्याच्या सामान्य प्रशासनाकडून एक परिपत्रक प्रसिद्ध केले जाणार आहे. त्यामध्ये महाभरतीची प्रक्रिया कशी असेल, त्यावर नियंत्रण कोणाचे असणार याबद्दल स्पष्टीकरण दिले जाणार आहे.


मेगाभरतीमधील महत्त्वाचे मुद्दे


मेगाभरतीनंतर राज्याच्या तिजोरीतून दरवर्षी नऊ हजार कोटी द्यावे लागणार


सामान्य प्रशासन (जेईडी) विभाग 10 एप्रिलपर्यंत शासकीय मेगाभरतीचे नियोजन ठरवणार


शासकीय रिक्त पदांच्या भरतीसाठी 15 एप्रिलपर्यंत महाआयटीतर्फे खासगी एजन्सीची नियुक्ती होणार


महापरीक्षा पोर्टलकडील 35 लाख विद्यार्थ्यांचे डाटा महाआयटीला सुपूर्द


गृह, सार्वजनिक आरोग्य, सामाजिक न्याय, कृषी व पशुसंवर्धन, महसूल विभागातील सर्वाधिक पदांची भरती


सर्वाधिक रिक्त पदे कोणत्या विभागात?
गृह विभाग - सुमारे 28 हजार पदं
सार्वजनिक आरोग्य - 20594 पदं
जलसंपदा विभाग -20793 पदं
कृषी विभाग - सुमारे 14 हजार पदं
महसूल आणि वन विभाग - सुमारे 12 हजार पदं
शालेय क्रीडा विभाग - सुमारे 5 हजार पदं
सार्वजनिक बांधकाम विभाग - 8628 पदं


Vacancies in Maharashtra Govt | राज्यात विविध सरकारी विभागांमध्ये दोन लाखांहून अधिक रिक्त पदं