मुंबई :  कोरोनाच्या तिसऱ्या वाटेचा सर्वाधिक फटका आपल्या लहानग्यांना होऊ शकतो असा अंदाज बांधला जात आहे. म्हणून ही बातमी ज्यांच्या घरात लहान मुल आहेत त्यांच्यासाठी महत्वाची आहे. पण कोरोनाच्या काळातील रुग्णांच्या उपचारात झालेली वाताहात पाहता कोरोनाच्या पादुर्भावात जर लहान मुलं सापडली तर आपण त्यांना उपचार देण्यासाठी सक्षम  आहोत का? असा सवाल उपस्थित होतोय.


देशभरात सध्याच्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही लहान मुलांमध्येही कोरोनाच्या प्रादुर्भावाचं प्रमाण पहायला मिळाला आहे. औरंगाबाद, पुणे, मुंबईत 1 महिन्याच्या बाळापासून ते 30 वर्षांच्या तरुणाचा कोरोनामुळे जीव गेलाय. त्यातच आता तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि त्याचं मुख्य कारण असणार आहे चिमुरड्यांचं न झालेलं लसीकरण. शिवाय रेमडेसिवीर आणि इतर औषधेही लहान मुलांना द्यावी की नाहीत याबाबत स्पष्टता नाही. 


'इंडियन अकॅडमी ऑफ पेडिऍट्रीक्स'नेही लहान मुलांमधील वाढत्या संसर्गाबाबत चिंता व्यक्त केली आहे.  देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट तीव्र झालेले असतानाच 10 वर्षांखालील लहान मुलांमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय. आधीच बेडस्, ऑक्सिजन, रेमडेसिवीरच्या तुटवड्यानं दुसऱ्या लाटेत तोंडचं पाणी पळालंय. आता तिसऱ्या लाटेत जर लहान मुलांमध्ये हा संसर्ग वेगानं पसरला तर आताच त्याची तयारी व्हायला हवी, असंही तज्ञांचं मत आहे. 


लहान मुलांमधील वाढता कोरोना संसर्ग धोकादायक


महाराष्ट्रात 1 मार्च ते 4 एप्रिल 2021 पर्यंत एकूण 60, 684 लहान मुले कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली.यातील सुमारे 9,882 मुले 5 वर्षांखालील आहेत. मुंबई महानगर प्रदेशातील एकूण कोरोना रुग्णसंख्येच्या 20 टक्के रुग्णसंख्या ही लहान मुलांची आहे.


कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णांना बेड मिळणं मुश्कील झालं होतं. ऑक्सिजन बेड व्हेंटिलेटरसाठी धावाधाव करावी लागत होती. जर चिमुरड्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर त्यांना लागणारे ऑक्सिजन बेड, लहान मुलांसाठी व्हेंटिलेटर बेड पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे काय़ तर याचे उत्तर सध्या तरी नाही असंच आहे.  


लहान मुलांसाठी योग्य ती औषधे, जम्बो कोविड सेंटर, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर मास्क यांची व्यवस्था करणेही गरजेचे आहे. तसेच लहान मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक लशींच्या निर्मितीसाठी देशभरात प्रयत्न करणाऱ्या कंपन्यांना सरकारने योग्य ते सहाय्य देणंही तितकंच आवश्यक आहे.  


कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही लहान मुलांच्या संसर्गाचे प्रमाण वाढताना दिसते आहे.  'केंद्रीय आरोग्य खात्याकडून प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार देशभरातील 5 राज्यांमध्ये एकूण 79 हजार 688 मुले कोरोनाबाधित झाली आहेत.  छत्तीसगड, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि दिल्ली मध्ये कोरोनाबाधित लहान मुलांचा आकडा हा अनुक्रमे 5940, 7327, 3004 आणि 2733 इतका आहे.  हरियाणा सरकारच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, 11 मार्च ते 15 एप्रिल दरम्यान  11 हजार 344 कोरोनाबाधित लहान मुले आढळून आली आहेत.  कोरोनाचं संकट चिमुरड्यांपर्यंत पोहोचू द्यायचं नसेल तर आत्ताच कंबर कसणं गरजेचं आहे.