मुंबई :  फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांना घराबाहेर पडण्यास मुभा आहे.  पण राज्यात 144 कलम लागू झालेले असतांना देखील काही लोक विनाकारण बाहेर फिरतांना दिसत आहेत अशांवर पोलीसांनी तत्काळ कारवाई करावी असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. आज मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिकांचे अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरंसिगच्या माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी अजित पवारांनी आदेश दिले.

तसेच लोक विनाकारण घराबाहेर पडणार नाही याची काळजी घ्यावी असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. अन्ननागरी पुरवठा, सार्वजनिक आरोग्य, वैद्यकिय शिक्षण, पोलीस, अन्न औषध प्रशासन , नगरविकास विभागाकडून येणाऱ्या देयकांचे पेमेंट तातडीने करण्याच्या सुचना दिल्या असल्याची माहिती ही त्यांनी दिली.  खाजगी आस्थापनांमध्ये, कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांचे वेतन विशेषत: रोजंदारी कामगारांचे वेतन बंद करू नये असे आवाहन अजित पवार यांनी केले आहेत.

दरम्यान यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही सूचना दिल्या आहेत. पुढील पंधरा दिवस गांभीर्याने वागण्याची गरज असून आरोग्य व्यवस्थेवर लक्ष केंद्रीत करा, व्यापक जनजागृती करा आणि आरोग्य व्यवस्था वाढवतांना मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, यासारख्या शहरात ताकतीने काम करण्याच्या सुचना दिल्या आहेत.