रत्नागिरी : कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. सरकार, प्रशासन यांच्याकडून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन देखील केले जात आहे. रत्नागिरीमध्ये एक धक्कादायक बाब समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. रत्नागिरीतील साखरतर या गावातील सहा महिन्यांच्या बाळाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता सहा झाली आहे.


आठच दिवसांपूर्वी साखरतर येथील महिलेला कोरोनाची लागण झाली होती. महिलेच्या जावूला देखील कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं.  त्यानंतर आता याच घरातील सहा महिन्याच्या बाळाला कोरोना झाल्याचं समोर आले आहे. या घरातील जवळपास 17 व्यक्तिंचे कोरोनाची चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी तिघे कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या महिलेच्या घरातील सर्वच सदस्यांना जिल्हा रूग्णालयात क्वारंन्टाईन करण्यात आलं आहे.

साखरतर परिसर हा तीन किलोमीटरपर्यंत सील करून ठेवण्यात आला असून ड्रोनच्या माध्यमातून पोलिसांद्वारे नजर ठेवली जात आहे. नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन देखील केले जात आहे.

VIDEO | जेव्हा पोलीस शायर बनतात... रत्नागिरी पोलिसांची कोरोनाबाबत अनोखी जनजागृती



कशी आहे बाळाची प्रकृती?  

रत्नागिरीतील सहा महिन्याला बाळाला कोरोनाची लागण झाली आहे. पण, त्याबद्दल चिंता करण्याची गरज नाही. बाळाची प्रकृती स्थिर आहे. बाळरोग तज्ज्ञ सध्या बाळाच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली आहे.

जिल्ह्यात काय आहे कोरोनाची स्थिती

रत्नागिरी जिल्ह्यात 19 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रूग्ण सापडला होता. दुबईहून आलेल्या 50 वर्षाच्या व्यक्तिला कोरोनाची लागण झाली होती. दरम्यान, या रूग्णाला उपचाराअंती सोडण्यात आले आहे. तर, खेड येथील एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या तीन रूग्णांवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असून यामध्ये एका सहा महिन्याच्या बाळाचा देखील समावेश आहे.

जिल्हा रूग्णालय कोरोना रूग्णालय म्हणून घोषित

रत्नागिरी जिल्ह्यात सध्याच्या घडीला चिंता करण्याचे कोणतेही कारण नाही. पण, जिल्हा प्रशासनाकडून खबरदारीचे उपाय घेतले जात आहेत. जिल्हा रूग्णालय हे कोरोना रूग्णालय म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यानंतर सर्व विभाग हे इतरत्र हलवण्यात आले आहेत. जिल्ह्यातील विविध सरकारी रूग्णालयांमध्ये एक हजारपेक्षा देखील जास्त रूग्णांना क्वारंटाईन करून ठेवण्यात आले आहे. शिवाय, होम क्वारंटाईन व्यक्तिंची संख्या देखील मोठी आहे.

VIDEO | Bike Ban in Ratnagiri | रत्नागिरी नगरपालिका क्षेत्रात आता बाईक बंदी