मुंबई : महाराष्ट्राच्या आरोग्य विभागात लवकरच मोठी भरती होणार आहे. जवळपास 25 हजारांपेक्षा अधिक रिक्त पदं भरली जाणार आहेत. कोरोना व्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार हा मोठा निर्णय घेणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना विशेष अधिकार देण्यात आले आहेत.
गेली अनेक वर्ष आरोग्य विभागाची पंद रिक्त आहेत. त्यातच आता राज्यावर कोरोना व्हायरसचं संकट ओढावलं आहे. या संकटावर मात करण्यासाठी राज्य सरकारने आणखी एक पाऊल टाकत, ही रिक्त पदं भरण्याचा निर्णय घेतला आहे. ही भरती प्रक्रिया थेट वॉक इन इंटरव्ह्यू पद्धतीने होणार आहे.
कोरोनाने राज्यासह जगभरात थैमान घातलं आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या सेवेत आरोग्य विभागाचे कर्मचारी रात्रंदिवस राबत आहे. कोरोनाचं संकट मोठं आहे आणि त्याचा सामना करणारी यंत्रणा तोकडी पडत आहे. त्यामुळे ही पदं लवकरात लवकर भरुन कोरोनाशी दोन हात करण्यासाठी राज्य सरकार तयारीला लागलं आहे.
भरती प्रक्रियेदरम्यान गर्दी होणार नाही : राजेश टोपे
दरम्यान, आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेच्या वृत्ताला आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दुजोरा दिला आहेत. "आरोग्य विभाग हा महत्त्वाचा विषय आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मी या विषयाचा पाठपुरावा करत होतो. विधानसभेतही मी याबाबत आश्वासन दिलं होतं. नर्सेस, मल्टिपर्पज वर्कर, टेक्निशियन, डॉक्टर यांचा या भरती प्रक्रियेत समावेश असतील," अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
तसंच "या भरती प्रक्रियेदरम्यान गर्दी केली जाणार नाही. यासाठी रांगा नसतील. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या विशेषाधिकाराच्या माध्यमातून शिस्तबद्ध पद्धतीने ही प्रक्रिया राबवली जाईल," असंही त्यांनी सांगतिलं.
Health Department | आरोग्य विभागात लवकरच मेगा भरती; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची प्रतिक्रिया
Health Department | आरोग्य विभागात लवकरच मेगाभरती, 25 हजारांहून अधिक रिक्त पदं भरणार