Coronavirus updates: नायजेरियातून दोन वर्षांनी डोंबिवलीत आलेल्या एकाच कुटुंबातील चौघांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले होते. आता त्यांच्या संपर्कात आलेले भाऊ आणि बाधिताची आई या दोघांनाही कोविडची लागण झाली आहे. रुग्णांच्या दोन्ही नातेवाईकांना कोव्हिड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून कोणतीही लक्षणे जाणवत नसल्याची माहिती कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने दिली आहे.
नायजेरियात कामानिमित्त वास्तव्यास असलेली डोंबिवलीतील व्यक्ती आपली पत्नी तसेच 10 आणि 6 वर्षाच्या दोन मुलीसह 22 नोव्हेंबर रोजी डोंबिवलीत परतली होती. नायजेरियातून निघताना त्याने केलेली कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली होती. त्यांना कोणतीही लक्षणे नव्हती. मात्र पालिकेच्या आरोग्य विभागाकडून 2 डिसेंबर रोजी 'हर घर दस्तक' या लसीकरण अभियाना अंतर्गत केलेल्या पाहणीत या कुटुंबाची माहिती महापालिकेला मिळाली. परदेश प्रवासाचा पूर्वइतिहास असल्याने त्याची करोना तपासणी करण्यात आली. त्या चौघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
नायजेरियातून भारतात परतण्यापूर्वी कोव्हिड बाधित पती-पत्नीने कोरोना लस घेतलेली आहे. या चारही रुग्णांना कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसत नाहीत. त्यांना तातडीने पालिकेच्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. याच दरम्यान या चौघांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले असून प्रशासनाला अहवालाची प्रतिक्षा आहे.
या कोव्हिडबाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीची तपासणी केली असता रुग्णाच्या दोन कुटुंबियांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान, नायजेरियाहून परतलेल्या चौघांना भेटण्यासाठी हैद्राबाद मधून आलेल्या दोन नातेवाईकांची देखील हैदराबादमध्ये करण्यात आलेली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्याच्या संपर्कात आलेल्या नवी मुंबई मधील दोघांचा रिपोर्ट मात्र निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- चिंता वाढली! पुण्यात ओमायक्रॉनचे आढळले सात रुग्ण, एकाच कुटुंबातील सहा जणांचा समावेश
- पुण्यातील कोरोनाबाधिताला ओमायक्रॉन नाही, पण आढळला 'हा' व्हेरियंट
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha