मुंबई : वांद्रे येथील गर्दीच्या घटनेनंतर राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. वांद्रे येथील गर्दीच्या घटनेचं राजकारण होतंय का? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच या घटनेनंतर गृहमंत्री अमित शाह यांनी मुखमंत्री उद्धव ठाकरेंना फोन केला, तसा गुजरात आणि इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही फोन केला होता का? असा सवालही बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला.
वांद्रे येथील गर्दीची घटना घडल्यानंतर ट्विटरवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात हॅशटॅग सुरु झाला. मुख्यमंत्र्यांनी या घटनेची जबाबदारी घेऊन पदाचा राजीनामा द्यावा, राज्यात राष्ट्रपती शासन लागू करा, अशा मागण्या ट्विटरवर सुरु झाल्या होत्या. ट्विटरवर असे हॅशटॅग कसे सुरु होतात हा देखील प्रश्न आहे, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं.
लोकांना रस्त्यावर एकत्र येऊन गर्दी केल्याची घटना केवळ वांद्रे येथेच घडलेली नाही. याआधी सूरतमध्ये अशी घटना दोनदा घडली आहे. हैदराबादमध्ये घडली, केरळमध्ये घडली आहे, आणखी काही ठिकाणी अशा घटना घडल्या आहेत. वांद्रे येथील घटना घडल्यानंतर देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला. मात्र गुजरात आणि इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही त्यांनी फोन केला होता का? किंवा त्या राज्यांमध्ये ट्विटरवर असे हॅशटॅग फिरु लागले होते का? हे मला माहित नाही, मात्र याचं कारण काय? या घटनांमध्ये राजकारण तर होत नाही ना. सध्याच्या परिस्थितीचं राजकारण करु नये, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आवाहन केलं आहे. त्यामुळे असं राजकारण करणे चुकीचं आहे, असं थोरात यांनी म्हटलं. तर काही लोक या घटनांना धार्मिक स्वरुप देत आहेत, असंही बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं.
वांद्रे येथे जे लोक जमले होते, त्यांची गैरसोय होते, त्यांना अन्नधान्य मिळत नाही, असं त्यांनी कुठेही म्हटलं नाही. गेल्या महिनाभरापासून ते मुंबईत अडकले आहेत. त्यांच्या हातात काम नाही, घरात ते कोंडून आहेत. त्यांची घरंही छोटी छोटी आहेत. या सर्वांमुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. त्यामुळे आम्हाला आमच्या गावी परत जाऊद्या अशी त्यांची मागणी होती, असं बाळासाहेब थोरातांनी सांगितलं.
वांद्रे येथे नेमकं काय घडलं?
मंगळवारी (14 एप्रिल) दुपारी वांद्रे स्टेशन बाहेरील जामा मशिदीच्या जवळ हजारो लोक जमले होते. यामध्ये अधिक परप्रांतीय मजूर होते. आम्हाला आमच्या घरी सोडा अशी येथे जमलेल्या मजुरांची मागणी होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नेते आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी गर्दीला समजावण्याचा प्रयत्न केला. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी सर्वांना सूचनांचं पालन करण्याचं आवाहन केले. मात्र गर्दी नियंत्रणात येत नसल्याने पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला होता. त्यानंतर गर्दी नियंत्रणात आली. लॉकडाऊनमुळे रेल्वेची प्रवासी वाहतूक 3 मे पर्यंत बंद आहे. राज्यांच्या सीमाही सील करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत हातात कामधंदा नसताना दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न या मजुरांपुढे आहे. मात्र एवढी मोठी गर्दी याठिकाणी कशी जमली की ती जमवली होती. या अशा अनेक बाबींचा शोध पोलीस सध्या घेत आहेत.
संबंधित बातम्या :
- तुम्ही महाराष्ट्रात आहात चिंता करू नका, परप्रांतियांना मुख्यमंत्र्यांचा आवाहन
- मुंबईत सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी; वांद्रे स्टेशनबाहेर परप्रांतीय मजुरांची मोठी गर्दी
- Lockdown | वांद्रे गर्दी प्रकरणावरुन आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारवर निशाणा
Bandra Crowd Issue | वांद्रे स्थानकावर हजारोंच्या संख्येने लोकांची गर्दी, गावी परत जाण्याची मागणी