Coronavirus Lockdown कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने एप्रिल महिन्यापासून काही कठोर निर्बंध लागू करण्य़ास सुरुवात केली. सुरुवातीची संचारबंदी आणि त्यानंतर लागू करण्यात आलेला लॉकडाऊन. ब्रेक दि चेनअंतर्गत काही कठोर निर्बंधांचं पालन केलं जाणं बंधनकारक असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं. किंबहुना कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी ते महत्त्वाचंही होतं. याच निर्बंधांअंतर्गत अत्यावश्यक सेवांची दुकानं सुरु ठेवण्यासाठीही काही वेळा निर्धारित करुन देण्यात आल्या. 


लॉकडाऊनचा पहिला टप्पा पूर्ण होऊन आता दुसरा टप्पाही सुरु झालेला असतानाच नवे निर्बंध लागू झाले आहेत का, ते असतीलच तर मग शनिवार रविरारी अमुक एक दुकानं सुरु राहणार का, ती किती वेळासाठी सुरु राहणार असेल अनेक प्रश्न नागरिकांच्या मनात घर करत आहेत. त्याच प्रश्नांची ही उत्तरं... 


प्रश्न-१ -  राज्यभरातील चिकन, मटण, कोंबडी व इतर खाद्यपदार्थांची दुकान शनिवारी- रविवारी (वीकेंड ला) सुरु ठेवता येतील का? यासंबंधीच्या मालवाहतुकीवर काही निर्बंध लादण्यात आले आहेत का?


उत्तर – होय. चिकन, मटण, कोंबडी व इतर खाद्याची दुकाने आठवड्याच्या सात ही दिवस उघडे राहू शकतात. नागरिकांसाठी सकाळी 7 ते 11 पर्यंत सुरु राहू शकतात.  त्यानंतर ई-कॉमर्स सेवेच्या माध्यमाने होम डिलिव्हरी करता येईल. या कालावधीनंतर जर कोणीही ही सेवा देताना आढळल्यास त्यांच्याविरोधात दंडात्मक कारवाई केली जाईल. चिकन, मटण, कोंबड्यांच्या मालवाहतुकीवर कोणतेही निर्बंध नाहीत.


लॉकडाऊननंतरही राज्यात रुग्णसंख्या कमी होईना; शनिवारी तब्बल 63 हजार नव्या रुग्णांची भर


प्रश्न -२ - आंबे विकणारी दुकानं सकाळी अकरापर्यंत चालू ठेवली जाऊ शकतात का? या वेळेनंतर प्रक्रिया आणि वर्गीकरण, पिकवण्याचे काम करता येईल का?


उत्तर- ग्राहकांना आंबे विक्रीचं काम सकाळी 7 ते 11  पर्यंत करता येईल. ग्राहकांची फक्त याच वेळेत व्यवसाय करता येईल. त्यानंतर सेवा देताना कोणी आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते. परंतु श्रेणीकरण, वर्गीकरण व पिकवण्याचे काम यानंतरही चालू ठेवता येईल. सदर आदेशान्वये 11 वाजल्यानंतर होम डिलिव्हरी करता येईल किंवा स्थानीय आपत्तीव्यवस्थापन प्रशासनाने दिलेले आदेशांचे पालन करून सदर काम करता येईल. याच्या मालवाहतुकीवर कोणतेही निर्बंध असणार नाही.