मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव बघता एकीकडे देशभरात संचारबंदी लागू झाल्याने सर्वांना आता घरात बसून राहावं लागणार आहे. तर अनेकांना वर्क फ्रॉम होम देण्यात आलं आहे. त्यामध्ये शिक्षकांनी सुद्धा दहावी बोर्डाचे पेपर घरी तपासणे गरजेचे होते. मात्र संचारबंदी लागू झाल्याने 10 वीच्या जवळपास लाखो उत्तरपत्रिका शाळांमध्ये अडकून पडल्या आहेत. आता जोपर्यंत संचारबंदी मागे घेतली जाणार नाही तोपर्यंत हे शिक्षक शाळेत जाऊन उत्तरपत्रिका तपासू शकणार नाहीत.


वेळापत्रकानुसार 1 मार्च ते 23 मार्च पर्यंत दहावीची परीक्षा नियोजित होती. मात्र, आता शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी 23 मार्चला रोजी होणारा दहावीचा भूगोलाचा पेपर पुढे ढकल्याने संचारबंदी मागे घेतल्यानंतर त्याबाबतची तारीख सांगितली जाणार आहे. राज्यात कोरोनाचा वाढत प्रदूर्भाव लक्षात घेता शिक्षक संघटनांनी दहावीच्या उत्तरपत्रिका याआधी घरी देण्यात याव्यात आणि वर्क फ्रॉम होमद्वारे या उत्तरपत्रिका तपासण्याचे शिक्षकांना आदेश द्यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे शिवनाथ दराडे यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली होती. परंतु आता जवळपास सर्वच विषयाच्या उत्तरपत्रिका या शाळेत, केंद्रावर अडकून पडल्या आहेत. जर या उत्तरपत्रिका आधीच शिक्षकांना पुढच्या परिस्थितीचा विचार करुन घरी तपासण्यासाठीचा नियोजन केले असते तर या प्रश्नपत्रिका तपासण्याचे काम शिक्षक घरी करू शकले असते आणि हा गोंधळ निर्माण झाला नसता, असं मत अंधेरीच्या हंसराज मोररारजी हायस्कुलचे शिक्षक उदय नरे यांनी वक्त केलं आहे.


दहावीचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करणं अपेक्षित असतं मात्र आता शिक्षकांना पेपर तपासण्यासाठी विलंब होणार असून शिक्षकांनी हे पेपर तपासल्यानंतर नियामकाकडे (मोड्रेटर) जातात आणि त्यानंतर गुणपत्रक तयार केले जातात. याशिवाय एक भूगोलाचा पेपर सुद्धा बाकी असल्याने हा पेपर रद्द करून एकूण मिळालेल्या गुणांच्या सरासरी गुण या विषयासाठी देण्यात यावे अशी मागणी सुद्धा शिक्षक करत आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात यावर काय निर्णय घेतला जातो आणि राज्याचा शिक्षण विभाग काय निर्णय घेऊन हा तिढा सोडवतो हे चित्र काही दिवसात स्पष्ट होईल.


संबंधित बातम्या :