Lockdown : राज्यात कोरोना बाधित रुग्णांचं प्रमाण वाढत असल्याचं दिसून येत आहे. कोरोनाचे रुग्ण वाढल्यानंतर राज्यातील काही शहरांमध्ये पुन्हा कडक नियम करण्यात येत आहेत. यात मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यांचा समावेश आहे.


पुणे
पुण्यात रात्री 11 ते पहाटे सहापर्यंत पुन्हा संचारबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पुण्यातील शाळा, महाविद्यालय 28 फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट रात्री अकरा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी, पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत हा निर्णय झाला. शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस 28 फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी अभ्यासिका सुरुच ठेवण्यात येणार आहेत. कोरोना संसर्ग रोखण्यासंदर्भातील नियमावलीची कडक अंमलबजावणी करुन ही परवानगी देण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांत कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता पुणे शहरासह जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.


लग्न, समारंभास केवळ 200 जणांची उपस्थिती
विवाह सोहळ्यास किंवा समारंभास होणारी गर्दी लक्षात घेता, यावरही कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला असून लग्न, समारंभास केवळ 200 जणांची उपस्थितीच असावी लागेल, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. हाही निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे.


मुंबई
मुंबई महापालिकेने रुग्णसंख्या नियंत्रणात यावी म्हणून नियम आणखी कडक केले असून मास्क न वापरल्यास दंडात्मक कारवाई अधिक कडक केली आहे. रुग्णवाढी मागे स्थानिकांचा हलगर्जीपणा हे सुद्धा एक कारण असल्याचं मुंबईच्या महापौरांनी सांगितले आहे. त्यामुळे प्रशासनासोबत आपण सुद्धा आपली काळजी आणि खबरदारी घेणे गरजेचे आहे. मागील दोन दिवसांपासून महापालिकेकडून रेस्टॉरन्ट्स बार आणि हॉटेल्सवर कारवाई धडक मोहिम हाती घेण्यात आली आहे.


नागपूर
नागपुरात कोरोनाचं वाढतं संकट पाहता शहरात पाचवी ते आठवी पर्यंतच्या शाळा बंद करण्याचे निर्देश मनपा प्रशासनाला देण्यात आले आहेत. नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी ही माहिती दिली आहे. नववी आणि दहावी या वर्गासाठी परीक्षा घेणे महत्वाचे असल्याने त्यांच्या परीक्षा कोरोना नियमांचे पालन करून घ्याव्या, असं दयाशंकर तिवारी म्हणाले. प्रायव्हेट ट्युशन, क्लासेसच्या ठिकाणी कठोर तपासणी करावी, अशी सूचनाही प्रशासनाला करण्यात आली आहे.


अमरावती विभाग
अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांसाठी (अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम) कोविड 19 च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनासाठी सुधारित निर्देश पारीत करण्यात आले आहे. सर्व प्रकारची दुकाने/आस्थापना ह्या सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत सुरू राहतील. सर्व प्रकारची उपहारगृहे, हॉटेल्स प्रत्यक्ष सुरू न ठेवता फक्त पार्सल सुविधेत परवानगी राहील. लग्नसमारंभकरिता 25 व्यक्तींना वधू-वरासह परवानगी राहील. जिल्हा बस वाहतूक करताना बसमधील असलेल्या एकूण प्रवासी श्रमतेच्या 50 टक्के प्रवासी वाहतुकीकरिता परवानगी राहील.


धार्मिक स्थळी एका वेळी दहा व्यक्तीपर्यंत मर्यादित स्वरूपात नागरिकांसाठी सुरू राहतील. संपूर्ण अमरावती विभागातील ग्रामीण व शहरी भागामध्ये संचारबंदीच्या कालावधीत सर्व प्रकारची शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक प्रशिक्षण केंद्रे, खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस हे बंद राहतील. सोबतच अमरावती विभागातील ग्रामीण व शहरी भागांमध्ये संचारबंदीच्या कालावधीत सर्व प्रकारची सिनेमागृहे, व्यायाम शाळा, जलतरण तलाव, मनोरंजन, उद्याने, नाट्यगृहे संबंधित ठिकाणे ही बंद राहतील. विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी हे आदेश पारीत केले आहेत.


वर्धा
वाढत्या कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येमुळे वर्धा जिल्ह्यात संचारबंदी करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशी वाहतूक सेवा बंद ठेवण्यात आली आहे. प्रवाशी सेवा बंद असल्याने बाहेरगावाहून आलेल्या प्रवाशांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे. गावी कसे जायचे? असा प्रश्न प्रवाशांपुढे निर्माण झाला आहे. काही विद्यार्थी, प्रवाशी सकाळी ट्रेनने गावी जाण्यासाठी वर्ध्यात आले. पण बस बंद असल्याने प्रवाशांची अडचण झाली आहे.