पुणे/पंढरपूर : चैत्रवारीपासून माऊलींच्या आषाढी वारीच्या पालखी सोहळ्याची तयारी सुरु होते. पण यावर्षी ते सगळं ठप्प आहे. महाराष्ट्रभरातून येणारे दिंडी प्रमुख, वारकरी यांच्या मनात आषाढी वारीच्या नियोजनाबाबत संभ्रम आहे. त्यामुळे शासनाने यावर स्पष्टता द्यावी अशी मागणी होते आहे. यावर्षी संत मुक्ताई पालखी सोहळा प्रस्थानाची तारीख 27 मे आहे. देहूमधील संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान नियोजित तारीख 12 जून आहे. आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान नियोजित तारीख 13 जून आहे. त्यामुळे अगदी तोंडावर आलेल्या या उत्सवाची रुपरेषा ठरवण्यासाठी सरकारने पावलं उचलावित असं श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे वंशपरंपरागत चोपदार रामभाऊ चोपदार यांनी म्हटलं आहे. देहूचे पालखी सोहळा प्रमुख असलेले अभिजीत मोरे यांनीही शासनाच्या निर्देशांवर उत्सवाचं स्वरुप अवलंबून असल्याचं सांगितलं.

Continues below advertisement


आषाढीसाठी राज्यभरातून जवळपास 150 ते 200 पालखी सोहळे येत असले तरी यात प्रामुख्याने सात मानाच्या पालख्यांचे महत्त्व संप्रदायात असते. याच सात पालख्यांसोबत जवळपास 10 ते 15 लाख वारकरी पायी चालत पंढरपूरला येतात. या प्रमुख पालख्यांपैकी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांचे पालखी सोहळे पुणे परिसरातून येतात. सध्या पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे कोरोनाचे मोठे संकट असल्याने हा रेड झोन करण्यात आला आहे. याच पद्धतीने संत निवृत्तीनाथ यांची पालखी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर इथून तर संत एकनाथ महाराजांची पालखी औरंगाबादच्या पैठण इथून येत असल्याने त्यांचीही वाट कोरोनाने अडवून धरली आहे. मानाच्या पालख्यांपैकी सर्वात दुरुन म्हणजेच मुक्ताईनगरमधून संत मुक्ताबाई यांची पालखी येते. तब्बल 750 किलोमीटरचा पायी प्रवास करुन 34 दिवसात ही पालखी पंढरीत पोहोचते.


"दरवर्षी महाराष्ट्राभरातून साधारणपणे 15 लाख वारकरी मजलदरमजल करत पंढरपूरमध्ये पोहोचतात. पण यावर्षी करोनाचा प्रादुर्भाव पाहता इतकं भव्य दिव्य स्वरुप असू शकत नाही याची वारकऱ्यांना कल्पना आहे. याचं स्वरुप संयमातून करण्यासाठी वारकरी सकारात्मक आहे. पण आता मुक्ताईंचा पालखी सोहळा 20-22 दिवसांवर आला आहे तर माऊलींचा पालखी सोहळा 38 दिवसांवर आला आहे. पण अजूनही प्रशासनाने याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे लवकरात लवकर पालखी सोहळ्याच्या प्रशासकांशी चर्चा करुन निर्णय घ्यावा," असं रामभाऊ चोपदार यांनी म्हटलं.


तर देहूचे पालखी सोहळा उत्सव प्रमुख अभिजीत मोरे हे म्हणाले की, "दरवर्षी प्रस्थान सोहळ्यात देहूमधून 330 दिंड्या पंढरपूरकडे रवाना होतात. पण यावर्षीच्या संकटांची सगळ्यांना कल्पना आहे. आमच्याकडे काही दिंड्या कर कर्नाटकमधूनही येतात. अशा दिंडी प्रमुखांचे आम्हाला सातत्याने फोन येत आहेत. त्यांच्यकडून सात्यत्याने विचारणा होते आहे की आम्ही काय करायचं. पण आता शासनाच्या निर्णयावर सगळं अवलंबून आहे."


तुकोबांची आणि माऊलींची पालखी पुण्यात मुक्कामी असते. ज्या ठिकाणी या पालख्यांचा मुक्काम असतो ते ठिकाण सध्या कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत. त्यामुळे पालखीचं स्वरुप कसं असावं यावर विचार होणं गरजेचं असल्याचं वारकऱ्यांचं म्हणणं आहे.


"आषाढी कार्तिकी विसरु नका मज सांगतासी गुज पांडुरंग..." हे संतवचन जरी प्रमाण असले तरी यापूर्वी 1896 साली प्लेगची साथ आली होती तेव्हा देखील ब्रिटिश सरकारने आषाढी आणि इतर पालखी सोहळे रद्द करुन प्रातिनिधिक स्वरुपाची यात्रा केल्याचं सांगितलं जातं. यंदाचा धोका खूपच मोठा आहे. पंढरपूर परिसरात कोरोनाला अद्याप शिरकाव करता आलेला नसला तरी सोलापूर शहरात कोरोनाचा फास आवळत चालला आहे. अशावेळी आषाढी यात्रेबाबत शासनाला तातडीने निर्णय घ्यावा लागणार आहे, जेणेकरुन राज्यभरातील लाखो भाविकांच्या मनातील संभ्रम दूर होऊन चित्र स्पष्ट होईल.