कोल्हापूर : कोल्हापुरात कोरोना व्हायरस संशयित 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. संबधित व्यक्तीला 15 मार्चला कोरोना संशयित म्हणून सीपीआरमध्ये (छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालय) दाखल करण्यात आलं होतं. मृत व्यक्तीचे सॅम्पल्स तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले होते. आज त्याचे रिपोर्ट्स येणार होते, मात्र रिपोर्ट्स येण्याआधीचा या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या व्यक्तीचा मृत्यू कोरोनामुळेच झालाय का हे रिपोर्ट्स हाती आल्यानंतर स्पष्ट होईल.


मृत व्यक्ती मूळ हरियाणाची रहिवाशी होती, मात्र कामानिमित्त हातकणंगले तालुक्यातील नागाव याठिकाणी राहत होती. संबंधित व्यक्तीने 8 मार्च ते 15 मार्च दरम्यान हरियाणा,दिल्ली, मुंबई, पुणे आणि कोल्हापूर असा टॅक्सीने प्रवास केला होता. कोल्हापुरात आल्यानंतर या व्यक्तीला सर्दी, खोकला आणि श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने नातेवाईकांनी त्यांना कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र प्रकृती अधिक खालावल्याने आणि कोरोनाच्या धास्तीने नातेवाईकांनी त्यांना सीपीआरमधील कोरोना कक्षात दाखल केलं. वैद्यकीय पथकाने त्यांची कोरोनाची प्राथमिक तपासणी करून उपचारासाठी आयसोलेशन कक्षात हलवले. उपचारादरम्यान वृद्धास श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने व्हेन्टिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.


पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी एकाला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे एकट्या पुणे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 16 वर पोहोचली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईप्रमाणेच पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्येही जमावबंदी लागू करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड दोन्ही पोलीस आयुक्तांकडे प्रस्ताव दिल्याची जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी माहिती दिली आहे.


गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन पुणेकरांना करण्यात आलं आहे. याशिवाय पुण्यात आजपासून मॉलमधील फक्त जीवनावश्यक वस्तूंचीच दुकानंच सुरु राहणार आहेत. तर 31 मार्चपर्यंत शाळा, महाविद्यालये बंद राहणार असल्याचं विभागीय आयुक्तांनी सांगितलं आहे.


राज्यात कोरोना बाधितांची संख्या 36 वर




  • पुणे - 16

  • मुंबई - 5

  • ठाणे - 1

  • कल्याण- 1

  • नवी मुंबई -  1

  • पनवेल - 1

  • नागपूर - 4

  • अहमदनगर - 1 

  • यवतमाळ -2

  • औरंगाबाद - 1


देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 107 वर




  • महाराष्ट्र -33

  • केरळ - 22

  • पंजाब - 1

  • दिल्ली - 7

  • जम्मू कश्मीर - 2

  • लडाख - 3

  • राजस्थान - 4

  • उत्तरप्रदेश - 11

  • कर्नाटक - 6

  • तामिळनाडू - 1

  • तेलंगाना - 3

  • हरयाणा - 14

  • आंध्रप्रदेश - 1


#Coronavirus Positive Patients | पिंपरीत आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह,पुण्यात 16 तर राज्यात 33 रुग्ण


संबंधित बातम्या