सोलापूर : गेल्या काही दिवसांपासून सोलापुरातील भाजी मंडईत दिसणाऱ्या गर्दीवर प्रशासनाने चांगले नियोजन केल्याचे पाहायला मिळत आहे. 20 एप्रिलपासून सुरू असलेली संपूर्ण संचारबंदी आज शिथिल करत लोकांना जीवनावश्यक वस्तुच्या खरेदीसाठी सूट देण्यात आली आहे. त्यामुळे आज पुन्हा गर्दी होण्याची शक्यता वाटत होती. मात्र प्रशासनाच्या योग्य नियोजन आणि पोलिसांच्या बंदोबस्तमुळे शिस्तबद्ध पद्धतीत भाजी विक्री पार पडली.


शहरातील श्री सिध्देश्वर मार्केट यार्डमध्ये आज सकाळी शेतकरी, भाजीपाला व फळविक्रेत्यांनी शारीरिक अंतर राखत, प्रत्येकांनी मास्कचा वापर करुन शिस्तबद्ध खरेदी विक्री केले. यावेळी शहर गुन्हे शाखा पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.अशाच प्रकारे शहरातील इतर ठिकाणीही नागरिकांनी आज खरेदी केली. यावेळी स्वतः महापालिका आयुक्त दीपक तावरे, महापौर श्रीकांचना यन्नम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्यासह सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी भाजी मंडईच्या जागांवर सकाळपासून उपस्थित होते. त्यामुळे अत्यंत शिस्तीत सोलापुरातील भाजी मंडईतील व्यवहार आज पार पडले.



सोलापुरातील कोरोनाची सद्यस्थिती


सोलापूरात आज पुन्हा 3 रुग्णांचे कोरोना अहवाल पॉसिटिव्ह आले आहेत. तर यापैकी एका वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे सोलापुरातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 68 वर पोहोचला आहे. कालपर्यंत हा आकडा 65 होता. मात्र आज 3 रुग्णांची भर यामध्ये पडलेली आहे. तर सोलापुरात आतापर्यंत एकूण 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. उर्वरित 62 रुग्णांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज अहवाल प्राप्त झालेले तीन रुग्ण रेल्वे स्टेशन, सिद्धेश्वर पेठ आणि बापूजी नगर परिसरातील आहेत. तर मृत व्यक्तीचे वय 76 वर्षे होते. ज्यांना 26 एप्रिल रोजी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. आजच त्यांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले होते. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ही माहिती दिली आहे.


संबंधित बातम्या




Plasma Therapy | प्लाझ्मा थेरपी अजून प्रायोगिक पातळीवर, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती