मुंबई : कोरोना व्हायरसवरील लसीच्या वापराला काही दिवसात सरकारकडून मंजुरी देण्यात येईल, अशी आशा सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांनी व्यक्त केली आहे. कंपनीने यापूर्वीच चार ते पाच कोटी कोविशिल्ड लस डोस तयार केले आहेत, अशी माहितीही अदार पूनावाला यांनी दिली आहे.
अदार पूनावाल पुढे म्हणाले की,केंद्र सरकारवर अवलंबून आहे की त्यांना किती प्रमाणात आणि किती लवकर या लसीची आवश्यकता आहे. सीरम इन्स्टिट्यूट या आशियातील सर्वात मोठ्या लस उत्पादक कंपनीने सांगितले की जुलै 2021 पर्यंत लसचे 30 कोटी डोस तयार करण्याचे लक्ष्य आहे.
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये जितक्या लस तयार केल्या जातील त्यापैकी 50 टक्के भारताला मिळतील आणि उर्वरित 50 टक्के कोव्हॉक्सबरोबर सामायिक केले जातील. भारताची लोकसंख्या खूप मोठी आहे आणि कंपनीने तयार केलेल्या 5 कोटी डोसपैकी बहुतेक डोस देशातच वापरले जाऊ शकतात.
यापूर्वी, जानेवारीत कोरोनाची संभाव्य लस बाजारात आणण्याची तयारी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय औषध नियामक यूकेच्या औषध नियामकाकडे लक्ष देत आहे, जे लवकरच ऑक्सफोर्ड निर्मित कोविड -19 लसीला मंजुरी देऊ शकते. या महिन्याच्या सुरूवातीला कोरोना 19 लसींच्या तातडीच्या वापरासाठी भारत बायोटेक, सीरम इन्स्टिट्यूट आणि फायझर यांनी ड्रग्स कंट्रोलर ऑफ इंडियाकडे अर्ज केला होता. यूके, अमेरिका आणि बहरेनसह बर्याच देशांनी फायझर निर्मित लसीला मंजुरी दिली आहे.