मुंबई: जगभरात काही देशांत कोरोनाच्या लसीकरणास सुरुवात झाली आहे. भारतातही आता लवकरच कोरोनाच्या लसीकरणास सुरुवात होणार असल्याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले आहेत. सर्वसामान्यांमध्ये या कोरोनाच्या लसीसंदर्भात संभ्रम असल्याचं दिसून येतंय. ही लस कोणाला देणार, कुठं मिळणार, प्रत्येकानं घ्यायलाच हवी का किंवा त्यांचे काय परिणाम होतील अशा एक ना अनेक प्रश्नांची जंत्री सामान्यांच्या मनात आहे. या प्रश्नांचे निरसन मुंबईतील प्रसिध्द कन्सल्टंट यूरोलॉजिस्ट अॅन्ड रेनल ट्रान्सप्लांट सर्जन असलेले डॉ. संतोष गवळी यांनी करण्याचा प्रयत्न केला आहे. एका पेशंटने त्यांना याबाबत विचारलेल्या 15 प्रश्नांचे सोप्या शब्दात उत्तरं देण्याचा प्रयत्न केला आहे.
आपण याची माहिती प्रश्नोत्तरात समजून घेऊ.
1) कोरोना लस लवकर उपलब्ध होईल का?
- होय. काही महिन्यातच ती उपलब्ध होणार
2) प्रत्येकानं ती घेतली पाहिजे का?
-होय. प्रत्येकानं ती घ्यायला हवी.
3) कोरोनाची लस कोणाला मिळेल?
-आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि इतर कोरोना योद्ध्यांना प्राधान्य दिलं जाईल. त्यानंतर वयोवृध्द आणि आजारी लोकांना लस देण्यात येईल. शेवटी ज्यांचं आरोग्य चांगलं आहे त्यांना लस दिली जाईल.
4) कशा पध्दतीनं लसीकरण करण्यात येईल?
- सार्वजनिक आणि खासगी भागिदारीच्या माध्यमातून देशभर लसीकरण करण्यात येईल.
5) कोरोना प्रतिबंधक लस कोण देणार?
-यासाठी सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. त्यांच्याकडून ही लस देण्यात येईल.
6) लस कोणत्या ठिकाणी देण्यात येणार?
-सरकारने मान्यता दिलेल्या सार्वजनिक तसेच खासगी ठिकाणी ही लस देण्यात येईल.
7) या आधी तुम्हाला कोरोना होऊन गेला असेल तर आता लस घेणं आवश्यक आहे का?
-होय. पण तुम्हाला सर्वात शेवटी प्राधान्य देण्यात येईल.
8) कोरोना होऊन गेलेल्यांना या लसीची उपलब्धता कधी होईल?
-कधीही होऊ शकते, पण तुमच्या शरीरात अॅन्टीबॉडिज् तयार झाले नसतील तर तुम्हाला लस लवकर मिळू शकेल.
9) इतर आजार असलेल्या व्यक्तीला कोरोनाची लस मिळेल का?
-होय. अशांना प्राधान्याने लस मिळेल
10) कोणत्या कंपनीची लस सर्वोत्कृष्ट आहे?
-सर्वच लसी चांगल्या आहेत. जी लस पहिली उपलब्ध होईल ती अधिक चांगली आहे. भारताचा विचार केला तर ऑक्सफर्डची लस ही भारतीयांसाठी योग्य आणि किफायतशीर किंमतीत उपलब्ध होईल. ती 2-8 डिग्री सेल्सिअसमध्ये साठवता येईल.
11) लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतल्यानंतर किती काळात कोरोनापासून संरक्षण होईल?
-दुसरा डोस घेतल्यानंतर 15 दिवसांनी संरक्षण होईल. या लसीमुळे कोरोनापासून 70-95 टक्के प्रभावीपणे संरक्षण होईल आणि हॉस्पिटलमध्ये भरती होण्याची गरज पडणार नाही.
12) या लसीचा प्रभाव किती काळापर्यंत असेल?
-याची नेमकी माहिती नाही. हे कदाचित आयुष्यभरासाठीही असेल. शरीरातील T सेलच्या रिस्पॉन्सवर ते अवलंबून आहे.
13) भविष्यात यावर दुसऱ्या कोणत्या लसीची आवश्यकता असेल?
-याचं उत्तर काळच देईल. पण अशा प्रकारची इतर कोणती लस घ्यावी लागणार नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे.
14) लहान मुलांना ही लस द्यावी लागेल का? तसं झालं तर किमान किती वयाच्या मुलांना ही लस द्यावी लागेल? प्रौढ व्यक्तिला देण्यात आलेल्या लसीच्या किती प्रमाणात ती द्यावी लागेल?
-लहान मुलांना लस द्यावी लागेल पण त्यांचा प्राधान्यक्रम सर्वात शेवटी असेल. डोसचे प्रमाण सारखेच असेल. यावर अभ्यास सुरु आहे.
15) या लसीचे दुष्परिणाम काय असू शकतात?
-स्थानिक प्रकारचे दुष्परिणाम असू शकतील. म्हणजे सर्दी, ताप आणि थकव्यासारखे साधे परिणाम होऊ शकतात. पण सर्व लसी सुरक्षित आहेत.
16) जवळपास 92-94 टक्के लोकांना असिम्प्टोमॅटिक इन्फेक्शन असल्याचं स्पष्ट झालंय. मग असिम्प्टोमॅटिक इन्फेक्शन असल्याचं चांगलं की कोरोना लस घेणं चांगलं?
-एप्रिलच्या तुलनेत कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या कमी झाल्यानं आता त्याची भिती कमी झालीयं. परंतु अजूनही मृत्यू थांबले नाहीत. कोरोना कोणाला होऊ शकतो हे कुणीच सांगू शकत नाही. तसेच त्यामुळे दीर्घकाळासाठी फुफ्फुस, हृदय, मूत्रपिंड आणि न्यूरोलॉजिकल आजार जडण्याची शक्यता आहे. त्यामुळे लस घेणं हा चांगला पर्याय आहे.
महत्वाच्या बातम्या: