मुंबई : कोविडच्या तिस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर जानेवारीच्या सुरुवातीला 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला  आणि बूस्टर डोसला सुरुवात झाली आहे. मात्र, आता अर्धा महिना उलटूनही या दोन्ही विशेष लसीकरण मोहिमांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही.  15 ते 18 वर्ष  लसीकरणाचा पहिला डोस आणि वयोवृद्धांकरता लसीचा तिसरा डोस यांचा वेग अत्यंत अत्यल्प आहे. यामुळे, लसीकरणाकरता प्रशासनाचं लक्ष्य गाठलं जाईल की नाही याबाबत अनिश्चितता आहे.


कोविडला रोखण्याकरता  लस हेच एकमेव शस्त्र आहे हे आतापर्यंत अनेकदा सिद्ध झालंय. कोविडच्या तिस-या लाटेत याच लसीचं कवच आणखी मजबूत व्हावं याकरता  15 ते 18 वर्ष   लसीकरण सुरु करण्यात आलं. सोबतच,  वयोवृद्ध, अत्यावश्यक  सेवेतील कर्मचाऱ्यांकरता देखील बुस्टर डोस सुरु करण्यात आले. पण, ज्यांच्यासाठी ही विशेष लसीकरण सुरु झालं त्यांचा मात्र लसीकरणाकरता अत्यल्प प्रतिसाद  दिसून येत आहे. 


मुंबईत 15 ते 18 वयोगटातील  लसीकरणाची आकडेवारी


31 जानेवारीपर्यंत 15 ते 18 वयोगटातील नऊ लाख मुलांचं लसीकरण पूर्ण होण्याचं लक्ष्य आहे. मात्र, आतापर्यंत केवळ दीड लाखा मुलांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. लक्ष्य गाठण्याकरता दररोज 35 हजार मुलांचं लसीकरण होणं गरजेचं आहे.  मात्र सध्या केवळ दररोज सरासरी 12 हजार मुलांना लस दिली जात आहे.


जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात  15 ते 18 वयोगटातील लसीचा पहिला डोस सुरु करण्यात आला. 31 डिसेंबर पासून यांनाच लसीचा दुसरा डोस देणार असेही घोषीत झाले. मात्र, अर्धा महिना उलटला तरी 15 ते 18 वयोगटातील  लसीकरणाचा वेग अत्यंत कमी आहे. 


बुस्टर डोसला अत्यल्प प्रतिसाद


राज्यात 10 जानेवारी पासून  कोमओरबीडीटी असलेले नागरिक, आरोग्य कर्मचारी अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांकरता बूस्टर डोसला सुरू करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा बुस्टर  डोसला सर्वांत कमी प्रतिसाद दिसून येतोय. राज्यात 19 लाख 72 हजार अत्यावश्यक  सेवेतील कर्मचा-यांपैकी केवळ पाच ते सात टक्के कर्मचाऱ्यांनी बूस्टर डोस घेतला आहे. मुंबईतही  दोन लाख 35 हजार अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी दोन डोस घेतलेले आहेत तर त्यातील 31 हजार 976 अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी बूस्टर डोस घेतला आहे.
 
कोविडच्या तिस-या लाटेत रुग्णसंख्या वाढीनं टोक गाठलं. मात्र, या तिस-या लाटेला सौम्य करण्यात लसीकरणाचा वाटा मोठा आहे असं मानलं जातो. तिसरी लाट येण्याआधी बुस्टर  डोसची मागणी करण्यात येत होती. मात्र, आता  लसीकरणाबाबतची उदासिनता काळजी वाढवणारी आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha