मुंबई : राज्य सरकारने हरतऱ्हेची जनजागृती करूनही राज्यात अद्याप 1 कोटींहून अधिक नागरिकांनी त्यांच्या कोरोना लसीचा दुसरा डोस घेण्यात उदासीनता दाखवली आहे. राज्यात आतापर्यंत 1 कोटी 14 लाख नागरिकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर लसीकरणाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे प्रशासनासमोरची डोकेदुखी वाढली आहे.
राज्यात आतापर्यंत 97 लाख 61 हजार नागरिकांना कोविशील्ड तर 17 लाख 32 हजार नागरिकांना कोवॅक्सिन लसीचा दुसरा डोस देणं बाकी आहे. पुणे, नाशिक, ठाणे, मुंबई नागपूर अशा शहरात कोविशील्ड तर बुलढाणा, यवतमाळ, अमरावती, वाशिम या जिल्ह्यात कोवॅक्सिनचा दुसरा डोस न घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
राज्यात सध्या कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन लसींचे मिळून दीड कोटी डोस शिल्लक आहेत. मात्र नागरिकांच्या उदासीनतेमुळे आता आरोग्यविभागापुढे डोकेदुखी वाढलेय. त्यामुळे या नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी प्रशासन आता काय पाऊलं उचलतंय ते पहावं लागेल.
दरम्यान, कोरोना लस घेणं बंधनकारक करु शकत नाही पण नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घ्यावेत असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आवाहन केलं आहे. तसेच राज्यात या महिन्याच्या सुरुवातीपासून 15 ते 18 या वयोगटातील मुलांच्या लसीकरणालाही सुरुवात झाली आहे.
ज्या नागरिकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतलाय त्या नागरिकांनी मुदत संपली तरी दुसरी लस घेतली नाही हे दिसून येतंय. राज्यासह मुंबईतही नागरिकांनी कोरोना लस घ्यावी, खासकरुन ज्या नागरिकांनी कोरोनाचा पहिला डोस घेतलाय त्या नागरिकांनी दुसरा डोस घ्यावा यासाठी राज्यसरकार आणि महापालिका प्रयत्न करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :