मुंबई : महाराष्ट्राची जनता संयम पाळत आहे. रुग्णसंख्या ओसरली नाही पण रुग्णवाढ स्थिरावली आहे. जर निर्बंध लावले नसते तर महाराष्ट्रात साडेनऊ ते दहा लाख रुग्ण असते, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. अजूनही काही दिवस निर्बंध पाळणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. 


मुख्यमंत्री म्हणाले की, "गेल्या वर्षीपासून महाराष्ट्रावर दुष्टचक्र आहे. गेले काही दिवस लॉकडाऊनसदृश्य बंधने टाकली आहे. सध्या गरज असली तरी तरी लॉकडाऊन करण्याची गरज वाटत नाही. कारण सगळे वागताना समजुतदारपणा दाखवत आहेत. त्यामुळे 9 ते 10 लाख अॅक्टिव्ह रुग्णांची शक्यता आपण 6 लाखांपर्यंत मर्यादेत ठेवली आहे."


लसीकरण केंद्रावर गर्दी करु नका : मुख्यमंत्री


आतापर्यंत  1 कोटी 58 लाख नागरिकांचं लसीकरण करण्यात आले आहे. कोरोना चाचण्यांच्या बाबतीत महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे. 12 कोटी डोस घेण्याची राज्याची तयारी आहे.  मे महिन्यात 18 लाख डोस मिळणार आहे. परंतु लसींचं उत्पादन मर्यादित स्वरुपात होत आहे त्यामुळे लसीकरण केंद्रावर गर्दी करू नका असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. जून ते जुलैमध्ये लसींचा साठा सुरळीत होईल असेही ते म्हणाले. 


आरोग्य सुविधा वाढवल्या : मुख्यमंत्री


राज्यातील आरोग्य सुविधा वाढवत आहोत. गेल्या वर्षी राज्यात 2 प्रयोगशाळा होत्या. राज्यात आतापर्यंत 609 प्रयोगशाळा वाढवल्या आहेत. सध्या राज्यात 5500 कोविड सेंटर उभारले आहेत. 11 हजार 713 वेंटिलेटर आपल्या राज्यात असून 28,937  आयसीयू बेड्स आहेत.


रेमडेसिवीरची अनावश्यक वापर नको : मुख्यमंत्री


सध्या रुग्णांना वेळेत ऑक्सिजन पुरवण्याचा प्रयत्न सुरु आहे.  रेमडेसिवीरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. राज्याला दररोज 50 हजार रेमडेसिवीरची गरज आहे. रुग्णांची संख्या वाढल्यास अडचण होऊ शकते.  


पुढील दोन महिन शिवभोजन थाळी मोफत : मुख्यमंत्री


करोनामुळे आपल्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम झाला आहे, अर्थगती मंदावली आहे, निर्बध लावावे लागत आहेत असे असले तरी गोरगरीबाची रोजी रोटी बंद होणार नाही याची काळजी शासनाने घेतली असून जाहीर केलेल्या 5500 कोटी रुपयांच्या मदतीच्या पॅकेजची राज्यात तातडीने अंमलबजावणी सुरु झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मोफत शिवभोजन थाळीचा 15 लाखांहून अधिक नागरिकांनी लाभ घेतल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. तर योजनेत आतापर्यंत चार कोटी लोकांनी या थाळीचा अस्वाद घेतल्याचे ते म्हणाले. संजय गांधी निराधार अनुदान योजनेसह इतर 9 सामाजिक सुरक्षा योजनेतील दोन महिन्यांचा 1428 कोटी रुपयांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्‍यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. सात कोटी नागरिकांना एक महिन्यासाठी 3 किलो गहू आणि 2 किलो तांदुळ राज्य शासनाच्यावतीने मोफत देण्यास सुरुवात झाली असून इमारत व बांधकाम मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या 13 लाख कामगारांपैकी 9 लाख 17 हजार कामगारांच्या बँक खात्यात 1500 रुपयांचे अनुदान जमा केल्याचे ही ते म्हणाले.  1 लाख 5 हजार घरेलू कामगारांना 15 कोटी 82 लाख रुपयांचा निधी वितरित झाला आहे. यास्तव 50 कोटी रु. चा निधी देण्यात आला आहे, नगरविकास विभागामार्फत नोंदणीकृत फेरीवाल्यांना मदत करण्यात येत असून त्यासाठी 61.75 कोटी रुपये दिले आहेत तसेच 11 लाख आदिवासी बांधवांना २ हजार रुपयांचे खावटी अनुदान देण्यात येत असल्याची  माहिती ही मुख्यमंत्र्यांनी दिली. नोंदणीकृत रिक्षा चालकांना ही 1500  ची मदत करण्यात येत आहे तर 3300 कोटी रु. चा निधी जिल्ह्यांमध्ये आरोग्य सुविधा उभ्या करण्यासाठी देण्यात आला आहे अशी माहिती ही मुख्यमंत्र्यांनी दिली.