मुंबई : कोरोना विषाणूला थोपवण्यासाठी सध्या लसीकरण हा एकमेव पर्याय आहे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पण सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर, रत्नागिरी, कल्याण डोंबिवली यासह अनेक भागांमध्ये लसींचा साठाच उपलब्ध नाही. त्यामुळे लसीकरण मोहीमेला ब्रेक लावावा लागत आहे. राज्यात 2 जुलैपर्यंत लसीच्या उपलब्धतेवर खुद्द आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शंका उपस्थित केली आहे. त्यामुळे आता लसीचा तुटवडा आणि दुसरीकडे लसीकरण हाच एकमेव पर्याय यातून कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका रोखण्यासाठी मार्ग कसा काढायचा हा प्रश्न उपस्थित होत आहे. 


सोलापूर जिल्ह्याला 24 जूनपासून लसीचा पुरवठा झालेला नाही. त्यामुळे सलग पाचव्या दिवशी सोलापुरातील लसीकरण मोहीम पूर्णत: ठप्प आहे. अशीच काहीशी परिस्थिती राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये आहे.


राज्यात कुठे लसीकरण सुरु आणि कुठे बंद?


औरंगाबाद : आज फक्त 300 डोस उपलब्ध आहेत. एकाच लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध असेल.


कल्याण-डोंबिवली : आज लसीकरण बंद, पण लसीचा साठा प्राप्त न झाल्यास आजही लसीकरण बंद


मिरा भाईंदर : आज लसीकरण मोहीम बंद, फक्त परदेशी जाणाऱ्या नागरिकांनाच लस मिळणार


वसई-विरार : लसी कमी असल्याने विरार, नालासोपाऱ्यात लसीकरण बंद


सोलापूर : आज लसीकरण बंद, शहरात सलग पाचव्या दिवशी तर ग्रामीण भागात सलग तिसऱअया दिवशी लसीकरण ठप्प


कोल्हापूर : गेल्या दोन दिवसांपासून लसीकरण ठप्प, आजही लसीकरण होणार नाही


सातारा : कुठेही लस उपलब्ध नाही, आजही लसीकरण बंद राहणार


सांगली : गेल्या तीन दिवसांपासून लस नाही, आजही लसीकरण बंद राहणार


रत्नागिरी : आज कुठेच कोरोना लसीकरण होणार नाही. जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून एकही डोस उपलब्ध नाही


पालघर : 54 केंद्रांवर लसीकरण सुरु, जिल्ह्यात दोन दिवस पुरेल इतकाच लसीचा साठा शिल्लक 


नंदुरबार : जिल्ह्यात लसीकरण सुरु, कोविशील्ड 2100, कोवॅक्सिन 9000 असे एकूण 11 हजार 100 डोस उपलब्ध, तीन दिवस पुरेल इतका लसीचा साठा उपलब्ध


गडचिरोली : जिल्ह्यात लसीकरण सुरु


नांदेड : लसीकरण सरु, सध्या कोविशील्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लसींचे एकूण 24 हजार डोस शिल्लक


अमरावती : लसीकरण सुरु


2 जुलैपर्यंत लसीचा तुडवडा : आरोग्य मंत्री
आज आपण सात-साडेसात लाख लोकांचं लसीकरण केलेलं आहे. लसीचा पुरवठा जास्त झाल्यास जास्त लसीकरण करु शकतो. आजच्या घडीला लसीची उपलब्धता जवळपासू शून्य झालेली आहे. दोन तारखेपर्यंत लस मिळणार नाही किंवा कमी प्रमाणात मिळेल. लस उपलब्ध होईल तसं लसीकरणाला वेग देऊ शकतो, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले.


70 टक्के लसीकरण झाल्यास कोरोनाची तिसरी लाट रोखता येऊ शकते : राजेश टोपे
तिसरी लाट येईल तेव्हा येईल. पण जर महाराष्ट्रात 70 टक्के लसीकरण झालं तर येणाऱ्या तिसऱ्या लाटेचा परिणाम आणि त्याची दाहकता तेवढी राहणार नाही. मृत्यूचं प्रमाण तेवढं राहणार नाही. केवळ आणि केवळ लसीकरणामुळेच आपल्याला कोरोनाची तिसरी लाट रोखता येऊ शकते किंवा त्याची दाहकता कमी करता येऊ शकते, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.