वाशिम : राज्य कुठे तरी कोरोनाच्या  गंभीर परिस्थितीतून  बाहेर पडत असताना हळूहळू लॉकडाऊनमध्ये शिथिलता येत आहे. कोरोना बाधित रुग्णसंख्या  कमी होऊ लागली आहे त्यामुळे    जनजीवन पूर्वपदावर येत आहे.  अशावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या  इशाऱ्याचं भान महाविकास आघाडीचे  घटक पक्ष असलेल्या  कॉंग्रेसलाच विसर पडल्याचं चित्र समोर आलं आहे. कोविड सेंटरची भेट आणि  कोरोना काळात कॉंग्रेसची कामगिरी आणि पक्ष संघटन याबाबत आढावा घेण्यासाठी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  नाना पटोले हे आज वाशीम जिल्हा दौऱ्यावर होते. तेथे कार्यकर्त्यांना गर्दी करत सोशल डिस्टन्सिंगचं उल्लंघन केलं.


कारंजा शहरातील  एसके  फंक्शन हॉल येथे पक्षाची आढावा बैठक होती.  या ठिकाणी  कोरोना नियमाचा आयोजकांना विसर पडल्याचं दिसून आलं. सोशल डिस्टन्सिंगचा अक्षरश: फज्जा उडाला होता. जिथे लग्न कार्य  किंवा अंत्यविधी साठी आणि इतर कार्यक्रम करण्यासाठी  शासनाने निर्बंध घातले आहे. मात्र या हॉलमध्ये  600 ते 800 च्या वर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. हे कमी होत की कमी म्हणून आयोजित कार्यक्रमात संगीत महफिलचा  कार्यक्रम ठेवण्यात आला होता.  या कार्यक्रमादरम्यान  कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी  नोटांची उधळण देखील केली. मात्र यावेळी नाना पटोले हे उपस्थित नव्हते. 


नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजकांनी त्यांच्या वयाच्या  वर्षाइतक्या वजनाचा  केक आणला होता. नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांसोबत तो केक कापून वाढदिवसही साजरा केला. मात्र गर्दी दिसताच त्यांनी कार्यकार्मातून काढता पाय घेतला.  यावेळी नाना पटोलेंसह  कॉंग्रेस नेते  माणिकराव ठाकरे, आमदार वजाहत मिर्झा, अतुल लोंढे, आमदार अमित झनक हे उपस्थित  होते.   
   
नाना पटोले उशिरा येणार असल्याने कार्यकर्त्यांच्या मनोरंजनसाठी आयोजक युसुफ पुंजानी हे सगळं आयोजन केलं होतं. युसुफ पुंजानी काही महिन्यांआधी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला होता. यापूर्वी पुंजानी राष्ट्रवादी कॉंग्रेस, भारिप,  बसपा पक्षांमध्ये होते. पुंजानी यांनी कॉंग्रेसमध्ये येताच कोरोना काळात  शक्ती प्रदर्शन करत कोरोना संबंधीने नियमांचं उल्लंघन केलं.