मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता यंदा राज्य मंडळाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाद्वारे गुण देण्याचा शासन निर्णय शिक्षण विभागाने घेतला. यासाठी अंतर्गत मूल्यमापनाचे निकष सुद्धा ठरवले. मात्र, मूल्यमापन करताना त्यामध्ये स्पष्टता नसल्याने मूल्यमापन नेमके कसे आणि कधी सुरू करायचे? असा प्रश्न शिक्षकांना पडला होता. यावर बोर्डाने शिक्षकांना अंतर्गत मूल्यमापन कार्यपद्धतीच्या सूचना देऊन मूल्यमापन प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. जेणेकरून या कार्यपद्धतीचा अवलंब करून शिक्षकांनी  विद्यार्थ्यांना कशाप्रकारे गुण द्यावे हे यामध्ये जाहीर करण्यात आले आहे. 


बोर्डाकडून जाहीर केलेल्या कार्यपद्धती आणि नियोजनामध्ये पुढील 20 दिवसात म्हणजेच 11 जून ते 30 जून मध्ये शाळांना विद्यार्थ्यांच्या परीक्षा, गृहपाठ घेऊन त्याचे गुण एकत्रित करून निकाल तयार करायचा आहे व तयार निकाल बोर्डाला सादर करायचा आहे. यामध्ये शिक्षकांना पुढील दहा दिवसात ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा, गृहपाठ सादर केले नाहीत, किंवा ज्या शाळांनी  परीक्षा, गृहपाठ वर्षभरात घेतले नाहीत. त्यांनी हे सर्व काम 11 ते 20 जून दरम्यान पूर्ण करायचे आहे. त्यामुळे शिक्षकांसमोर दहा दिवसात हे काम पूर्ण कसे करायचे? असा प्रश्न आहे. शिवाय, अनेक विद्यार्थी बाहेरगावी असून अनेकांना वारंवार सूचना देऊन सुद्धा त्यांनी परीक्षा आणि गृहपाठ देण्याकडे पाठ दाखवली असताना त्यांना गुण कसे द्यावे? असा सुद्धा प्रश्न शिक्षकांकडून विचारला जातोय. या दहा दिवसांमध्ये परीक्षा नेमका कशा घ्याव्यात? हा प्रश्न सुद्धा अजूनही अनुत्तरीत असल्याचं शिक्षकांकडून म्हटलं जाताय.


अंतर्गत मूल्यमानाच्या कार्यवाहीचे वेळापत्रक नेमके कसे असणार?



  • 10 जून सकाळी 11 ते दुपारी 1 च्या दरम्यान मुख्यध्यापक व शिक्षकांना मूल्यमापन कार्यपद्धतीबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे.

  • 11 ते 20 जून दरम्यान अपवादात्मक परिस्थितीत कोणत्याही प्रकारचे मूल्यमापन न झालेल्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करावे लागणार शिवाय, विषय शिक्षकांनी गुणतक्ते वर्ग शिक्षकांकडे सादर करावे लागणार आहे.

  • याच दरम्यान वर्ग शिक्षकांनी संकलित निकाल अंतिम करून निकाल शाळेच्या निकाल समितीकडे सादर करायचा आहे.

  • तर 12 ते 24 जून या दिवसांमध्ये वर्ग शिक्षकांनी तयार केलेल्या निकालाची निकाल समितीने परीक्षण व नियमन करून प्रमाणित करायचे आहे.

  • तर दहा दिवसांत म्हणजेच  21 जून ते 30 जून दरम्यान मुख्याध्यापकांनी  समितीने प्रमाणित केलेले विद्यार्थ्यांचे निकाल विषयनिहाय गुण मंडळाच्या संगणकीय प्रणाली मध्ये भरायचे आहेत. सोबतच निकालाचे सीलबंद पाकिटात विभागीय मंडळाकडे म्हणजेच बोर्डाकडे जमा करायचे आहे.

  • 3 जून पासून पुढे राज्य मंडळ परीक्षा निकालाबाबत राज्य मंडळ स्तरावर प्रक्रिया सुरू करेल व लवकरच बोर्ड दहावीचा निकाल जाहीर करेल.