भिवंडी : तालुक्यातील पडघानजीकच्या खडवली येथील मातोश्री वृद्धाश्रमात तब्बल 69 वृद्धांना कोरोनाची लागण झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या सर्व वृद्धांना ठाणे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. भिवंडी तालुक्यातील पडघा जवळील खडवली येथे नदीकिनारी मातोश्री वृद्धाश्रम असून त्या ठिकाणी सुमारे शंभरहून अधिक व्याधीग्रस्त वयोवृद्ध वास्तव्यास आहेत.


एकीकडे जिल्ह्यात विशेषतः भिवंडी शहर ग्रामीण भागात कोरोना आटोक्यात आला असल्याचे दिसत आहे, भिवंडी शहरातही शनिवारी (27 नोव्हेंबर) दिवसभरात केवळ 1 रुग्ण आढळून आला. तर संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामीणमध्ये 5 रुग्ण आढळून आले. त्यातच मागील आठवड्यात या आश्रमातील काही जणांना ताप आल्याने उपचार सुरू केले.यात एका व्यक्तीची कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह निघाल्याने खबरदारी म्हणून वृद्धाश्रम व्यवस्थापनाने सर्वांचीच चाचणी केली. ज्यानंतर 69 वृद्धांना कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं. आता या सर्वांना उपचारासाठी ठाणे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची महिती वृद्धाश्रम व्यवस्थापक अशोक पाटील यांनी दिली आहे.


जिल्ह्यातील लसीकरण वेगात


कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत ठाणे जिल्ह्यात कोविन पोर्टलवरील नोंदीनुसार शनिवारी (27 नोव्हेंबर) सायंकाळी सातपर्यंत 57 हजार 323 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 93 लाख 44 हजार 917 डोसेज देण्यात आले असून त्यापैकी पहिला डोस 58 लाख 26 हजार 899 नागरिकांना तर 35 लाख 18 हजार 18 नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. तर शनिवारी दिवसभरात लसीकरणाचे सुमारे 458 सत्र आयोजित करण्यात आले. मात्र अद्यापही बहुतांश आश्रमामध्ये लसीकरणं झाले नसल्याचेही समोर येत आहे.


हे ही वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha