मुंबई : गेल्या दोन वर्षापासून जगभरात कोरोना (Corona) महामारीने थैमान घातले आहे. या महामारीत आतापर्यंत शेकडो लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अनेकांचे संसार या कोरोनाने उद्धवस्त केले आहेत. कोरोना आल्यापासून गावपातळीपासून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत रोज कोरोनाची लागण झालेले रूग्ण, कोरोनातून मुक्त झालेले रूग्ण आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रूग्णांच्या आकडेवारीची (Corona death Statistics ) माहिती ठेवली जात आहे. परंतु आता या आकडेवारीबाबत एक धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातच या आकडेवारीत मोठा घोळ झाल्याचे समोर आले आहे. 


राज्य सरकारने महाराष्ट्रातील (maharashtra state government ) प्रत्येक कोरोना बाधित मृत्यूची नोंद घेतली आहे असे सांगितले जात आहे. एवढेच नाही तर महाराष्ट्रातल्या मृत्यूची नोंद ही देशात सर्वात जास्त पारदर्शी आहे. असाही राज्य सरकारचा दावा होता. परंतु, एबीपी माझाच्या (ABP majha) ग्राऊंड रिपोर्ट मधून हे चित्र तितकसं खरं नसल्याचं समोर आलं आहे. कारण त्याला पुष्टी देणारी आकडेवारी आता समोर आली आहे. 


महाराष्ट्र शासनाकडून जन्म-मृत्यूची नोंद करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आहे. गाव पातळीवरती झालेल्या मृत्यूची नोंद ग्रामपंचायतीत होते. तिथून पंचायत समितीकडे, तिथून जिल्हा परिषदेकडे आणि तिथून राज्यपातळीवरती माहिती संकलित केली जाते. या प्रक्रियेला civil registration system किंवा सीआरएस असे म्हणतात. या विभागात नोंदवलेल्या माहितीचा आम्ही गेल्या चार महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा केला. त्यातून जे काही दिसलं ते धक्कादायकच आहे. आमचा हा दावा नाही की आम्ही जे वाढलेले मृत्यू केवळ कोरोनामुळे झालेत असं सांगतो आहेत पण महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षांची तुलना केली तर मृत्यूचं प्रचंड मोठं तांडव दिसत आहे, त्यामागं कोरोनाच असावा हे मानण्यास पुरेशी जागा आहे. 


जानेवारी ते संप्टेंबर 2021 या नऊ महिन्यांची आकडेवारी आम्ही संकलित केली केली


जानेवारी महिन्यात महाराष्ट्रात 43976, फेब्रुवारी महिन्यात 46951 तर मार्च महिन्यात 51952 असे मृत्यू होत होते. 2018 पासून या तीन महिन्यांची सरासरी जवळपास हीच आहे. परंतु दुसरी लाट महाराष्ट्रत वादळा सारखी आली. कित्येकांची घरं उध्दवस्त करून गेली. त्यानंतर एप्रील महिन्यात 84363, मे महिन्यात 1 लाख 22 हजार 084, जून महिन्यात 88 हजार 812, जुलै 64 हाजर 759, ॲागस्ट महिन्यात 59 हजार 885 आणि संप्टेंबर महिन्यात 59 हजार 364 मृत्यूची नोंद झाली आहे.  


याचा अर्थ सरकारी आकडेवारी नुसार महाराष्ट्रात जेवढे कोरोनाने मृत्यू झालेत आहेत त्या पेक्षा कितीतरी अधिक मृत्यू झाले आहेत. आपन मात्र महाराष्ट्रात कोरोना विरोधात फार उत्तम काम करत आहोत असे चित्र रंगवत होतो. 


ज्या मुंबई मॅाडेलचा गवगवा करण्यात आला त्या मुंबईतही जानेवारी ते संप्टेबर या दरम्यान दुसऱ्या लाटेच्या काळात दुप्पट मृत्यू झालेत. जानेवारीत मुंबईत 6 हजार 959 मृत्यूची नोंद आहे. एप्रिलमध्ये 13 हजार 796, मे मध्ये 12 हजार 865 आणि जून मध्ये 10 हजार 256 मृत्यू झाले आहेत. 


महाराष्ट्रात देशात सर्वाधिक कोरोनाचे मृत्यू झालेत. महाराष्ट्र दीर्घकाळ लॅाकडाऊन सहन केला. तरीही ही आकडेवारी आम्ही तुम्हाला दाखवतोय ती सांगते की जे सरकारने सांगितलं होतं त्याहून कितीतरी अधिक मृत्यू झालेले आहेत. ही केवळ सरकारकडेच नोंदवले गेलेले मृत्यू आहेत. आम्ही या क्षेत्रातल्या तज्ञांसोबत संवाद साधला तेव्हा त्यांनी असं सांगितलं की, सरकार दरबारी सुद्धा ज्यांना मृत्युपत्राची गरज आहे अशाच मृत्यूच्या नोंदी होतात. ज्यांच्या नोंदींची गरज नाही असेसुध्दा हजारो मृत्यू असू शकतात ज्याची नोंद झालेली नाही.


महत्वाच्या बातम्या