मुंबई : गेल्या काही दिवसापासून असलेले निर्बंध, टेस्टिंग ट्रॅकिंग आणि ट्रिटमेंट  या त्रिसूत्रीचा योग्य वापर होत असल्यामुळे मुंबईसह राज्यातील रुग्णसंख्या कमी होत असल्याचे रुग्णबाधितांच्या अनुषंगाने दैनंदिन जाहीर होणाऱ्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. या पद्धतीनेच जर रुग्णांची संख्या  कमी होत राहिली तर मेच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याची शक्यता असल्याचे मत राज्यातील टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी यांनी एबीपी माझा डिजिटलशी बोलताना व्यक्त केलं आहे. 


एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कोरोनबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती. रुग्णांना ऑक्सिजन बेड्स मिळविण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत होतं. रेमडेसिवीरचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत होता. ऑक्सिजन मिळत नसल्यामुळे नागरिकांना इतरत्र हॉस्पिटलमध्ये स्थलांतरित करण्याची वेळ आली होती. मात्र आता परिस्थितीत  हळूहळू सुधारणा होत आहे. मुंबईत सोमवारी 3,876 नव्या रुग्णांची नोंद झाली तर राज्यात 48,700 रुग्ण आढळून आले आहेत. गेली अनेक दिवस दैनंदिन रुग्णसंख्या ही 60 हजाराच्या आसपास होती.  राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82.92 टक्के इतके झाले आहे.       
  
राज्यात सर्वच ठिकाणी कोरोनाने 'हजेरी' लावून प्रशासनातील  व्यवस्थेपुढे मोठे आव्हान उभे केले असतानाच  राज्यातील विविध भागात कोरोना आटोक्यात यावा म्हणून राज्यभर अटी शर्तीसह  टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. या टाळेबंदीतून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे.  या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखता यावा म्हणून शासन आणि प्रशासन नवनवीन गोष्टी राबविण्याच्या प्रयत्न करीत आहेत. सुरक्षिततेचे नियम पाळले तरच या आजाराचा सामना करणे शक्य होणार असल्याचे सर्वच वैद्यकीय तज्ज्ञ सांगत आहे. अशा या सर्वच भयंकर वातावरणात सुरुवातीच्या काळापासूनच अख्या देशात कोरोनाचा 'हॉटस्पॉट' ठरलेल्या मुंबई शहरातील रुग्णसंख्यने सगळ्याचं लक्ष आकर्षित करून घेतले होते, मात्र त्याच मुंबई शहराची 'तब्येत' आता हळूहळू सुधारत आहे. 


"सध्या मुंबई महानगरपालिका आणि राज्य शासन निर्बंध घालून ज्या उपाययोजना करत आहे त्याचा रुग्णसंख्या कमी होणे हा एकत्रित परिणाम आहे. मात्र  रुग्णसंख्या कमी झाली म्हणून काळजी घेणे थांबविणे मोठी चूक होईल. सातत्याने या आजाराशी लढत राहणे प्रतिबंधात्मक उपाय योजना करत राहणे ही आजच्या काळाची गरज आहे. ज्या पद्धतीने आपली रुग्णसंख्या काही दिवसापासून कमी होत आहे आणि जर का आपण अशाच पद्धतीने काळजी घेत राहिलो तर या कोरोनाच्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात थांबवू शकतो. कोरोनाच्या अनुषंगाने सुरक्षित वावर ठेवणे अपेक्षित आहे.  मात्र त्यात नागरिकांचे सहकार्य  महत्त्वाचे आहे. नक्कीच मुंबईची परिस्थिती हळूहळू सुधारत आहे. पहिल्यापेक्षा खूप बदल झालेला आहे. मोठ्या प्रमाणात बरे होणाऱ्यांची रुग्णसंख्या वाढली आहे. मात्र तरी मृत्यू दर कमी करणे हे आपले उद्दिष्ट आहे. सध्याच्या मृत्यु दरावरून आपल्याला एक टक्क्यापर्यंत पोहचायचे आहे. त्यासाठी याच पद्धतीने काम करत राहणे गरजेचे आहे. लोकांनी सुरक्षिततेचे नियम व्यवस्थित पाळले पाहिजे" अशी  माहिती राज्य सरकारच्या कोरोना विशेष कृती दलाचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी दिली.
 
मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील सर्व  आणि राज्य शासनाच्या अखत्यारीतील ( जी.टी हॉस्पिटल आणि सेंट जॉर्जेस हॉस्पिटल) सर्वच रुग्णालये या आजाराशी एकदिलाने मुकाबला करत आहे. " विशेष म्हणजे सर्वच रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि इतर  कर्मचारी रुग्णांना बरे करण्यासाठी विशेष मेहनत घेत आहेत. या सध्याच्या महामारीच्या काळात रुग्णांना  सुविधा पुरविताना काही समस्या निर्माण झाल्या. मात्र त्या सगळ्या समस्यांवर मात करत व्यवस्था काम करत आहे. एवढ्या मोठ्या संकटात चूक होऊ नये अशी अपेक्षा असते, मात्र काही वेळा अचानक काही समस्या निर्माण होतात. त्याचबरोबर खासगी रुग्णालये, दवाखाने आणि त्यातील डॉक्टर कर्मचाऱ्यांचा यामध्ये मोठा वाटा आहे. रुग्णसंख्या कमी होत आहे, मात्र लोकांनी सुरक्षिततेचे नियम पाळत राहणे गरजेचे आहे." असे, मुबंई महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.    


राज्याच्या इतर भागातील वाढलेला कोरोना रोखण्यासाठी स्थानिक प्रशासन त्यांच्या पद्धतीने काम करीत आहे. गेल्यावर्षी,  धारावी येथे  1 एप्रिल ते 8 जुलै या दरम्यान सुरू असलेल्या  या कोरोनाच्या युद्धात सगळ्याच काम करणाऱ्या शहरातील यंत्रणांना यश संपादन झाले होते. दिवसागणिक  नव्याने शेकडोने सापडणाऱ्या रुग्णसंख्येत हळू-हळू वाढ कमी झाली आणि एक वेळ अशी आली होती कि  केवळ एकच नवीन रुग्णांची नोंद धारावी परिसरात झाली होती. साथीच्या आजारांवर मिळविलेला हा ऐतिहासिक विजय होता. त्याची दखल  जागतिक स्तरावर घेतली गेली आणि जागतिक आरोग्य परिषदेने धारावी येथील कामाचे कौतुक केले होते. त्यानंतर धारावीचा पॅटर्न राबवावा अशी मागणी सर्वच स्तरातून होत होती.


महत्वाच्या बातम्या :