औरंगाबाद : नोटाबंदीच्या निर्णयावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा सरकारवर हल्लाबोल केलाय. नोटाबंदीचा निर्णय योग्य वाटला होता मात्र काळा पैसा बाहेर आला नाही, कारण काळा पैसा परदेशात आहे, असं म्हणत शरद पवारांनी सरकारवर टीका केली आहे.


नोटाबंदीला साठ दिवस उलटून अजूनही अर्थव्यवस्था विस्कळीत आहे. ग्रामीण भाग आणि सहकारी बँकांच्या व्यवहरांना नोटाबंदीचा सर्वात जास्त फटका बसला आहे, असं शरद पवार म्हणाले.

नोटाबंदीने बेरोजगारी वाढली : शरद पवार

नोटाबंदीमुळे देशातील 50 टक्के लघुउद्योगांवर परिमाण झालाय, तर 35 टक्के रोजगराला फटका बसला. नोटाबंदीपूर्वी 30 लाख लोक मनरेगा अंतर्गत कामावर येत होते. आता 83 लाखांवर हजेरी भरली आहे. म्हणजेच 53 लाख मजूर वाढले. कारण कामगारांना बाहेर काम नाही, असं शरद पवार यांनी सांगितलं.

सहकार चळवळ डबघाईला : शरद पवार

सरकारचा सहकारी संस्थांकडे पाहण्याचा दृष्टीकोन हवा तसा नाही. सहकारी बँकांची अर्थव्यवस्था व्यवस्थित व्हावी, यासाठी केंद्रात पाठपुरावा करणार असल्याचंही शरद पवार यांनी सांगितलं.

सहकार क्षेत्राला हातभाराची गरज असून येथे राजकारण आणण्याची गरज नाही. मुलभूत प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शासनाची भूमिका महत्त्वाची असते. सहकाराचा रस्ता सामान्य माणसाला मदत करणारा आहे. मात्र नोटाबंदीमुळे सहकार चळवळ डबघाईला आली असल्याची खंत शरद पवारांनी व्यक्त केली.

नोटाबंदीच्या निर्णयामुळे सामान्य माणूस दुबळा होईल. अर्थकारणाचा प्रश्न सामंजस्याने सोडवून सहकारी चळवळीला गती देण्याची गरज असल्याचं शरद पवारांनी सांगितलं.