कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील पुजारी हटाव आंदोलन आज आणखी तीव्र झालं आहे. श्री पूजक बाबुराव ठाणेकर यांना पोलीस बंदोबस्तात मंदिरात प्रवेश करू दिल्याच्या निषेधार्थ आज पुजारी हटाव संघर्ष समितीने जुना राजवाडा पोलीस ठाण्याबाहेर धरणे आंदोलन केलं.


ठाणेकर पिता-पुत्रावर कारवाईची मागणी करत आंदोलकांनी पुजाऱ्यासह प्रशासनाविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. धरणे आंदोलन सुरु असतानाच बाबुराव ठाणेकर पुन्हा मंदिरात गेल्याच समजताच जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी मंदिरात जाऊन केलेल्या घोषणाबाजीनंतर मंदिरात उडलेल्या गोंधळात ठाणेकर यांना पोलीस बंदोबस्तात मंदिरा बाहेर काढण्यात आलं. यामुळं मंदिर परिसरात तणावाचा वातावरण निर्माण झालं होतं.

अंबाबाई मंदिरातील देवीच्या पेहरावा वरून सुरु झालेल्या वादानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या समन्वय बैठकीमध्ये श्री पुजक अजित ठाणेकर आणि त्यांचे वडील बाबुराव ठाणेकर यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत मंदिरात प्रवेश न करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनी दिल्या होत्या. मात्र शुक्रवारी बाबुराव ठाणेकर यांनी मंदिरात प्रवेश केला. या प्रकाराबद्दल काळातच  पुजारी हटाव कृती समितीने पोलीस उपाधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांना यांची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ ठाणेकर यांना पोलीस बंदोबस्तात मंदिराबाहेर काढलं होतं.

ठाणेकर यांनी पालकमंत्री आणि जिल्हाधिकार्यांच्या सूचनेच उल्लंघन केल्याबद्दल संताप व्यक्त होत असतानाच शनिवारी पुन्हा बाबुराव ठाणेकर यांनी पोलीस बंदोबस्तात मंदिरात प्रवेश केला. यामुळे संताप अनावर झालेल्या पुजारी हटाव कृती समिती  पोलीस उपाधीक्षक डॉ. अमृतकर यांची भेट घेऊन चर्चा केली होती. या चर्चेदरम्यान गुन्हा दाखल असलेल्या ठाणेकर पिता-पुत्रांना अटक का होत नाही, असा सवाल करत पोलिसांच्या दुटप्पी भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली होती.

बाबुराव ठाणेकर यांना दिलेल्या बंदोबस्ताबद्दल अमृतकर हे समाधानकारक उत्तर न देऊ शकल्याने आक्रमक झालेल्या संघर्ष समितीनं आज जुना राजवाडा पोलीस ठाण्याबाहेर धरणे आंदोलन केलं. या वेळी ठाणेकर पिता-पुत्रासह प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत अंबा मातेचा जयघोष करण्यात आला.

यानंतर डॉ. सुभाष देसाई यांच्यासह विजय देवणे माजी आमदार सुरेश साळोखे शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी आपल्या भावना व्यक्त करत पोलिसांबद्दल रोष व्यक्त केला. या आंदोलनाचा उद्रेक झाल्यास त्याला पोलीस प्रशासन जबाबदार असेल असा इशारा दिला.

संघर्ष समितीकडून या वेळी ठाणेकर पिता-पुत्रा विरोधात लेखी तक्रार पोलीस उपधीक्षक डॉ अमृक्तकर आणि पोलीस निरीक्षक निशिकांत भुजबळ यांच्याकडे देण्यात आली. संघर्ष समितीकडून देण्यात आलेली हे शेवटची तक्रार असल्याचं सांगत इथून पुढे आंदोलन आपल्या हातात राहणार नाही असा संजय पवार यांनी इशारा दिला.

यानंतर पोलिस उपधीक्षक डॉ प्रशांत अमृतकर यांनी या प्रश्नी उद्या पोलीस अधीक्षकांनी बैठक आयोजित केली असल्याच सांगत बाजू काढून घेण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, पोलीस ठाण्यात धरणे आंदोलन सुरू असतानाच बाबुराव ठाणेकर हे मंदिरात आल्याचं आंदोलकांना समजलं. या मूळ संतप्त झालेल्या जिजाऊ ब्रिगेड च्या महिलांनी मंदिरात जाऊन घोषणाबाजी सुरु केली. काही क्षणात घडलेल्या या प्रकारामुळे पोलिसांची तारांबळ उडाली तर मंदिर आवारातील वातावरण हि तणावपूर्ण झालं. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत बाबुराव ठाणेकर यांना मंदिराबाहेर काढलं.

या जुना राजवडा पोलीस ठाण्यात झालेलं धरणे आंदोलन आणि त्यानंतर मंदिरात झालेल्या गोंधळानंतर मंदिर परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप आलं होतं. उद्या पोलीस अधीक्षक कार्यालयात होणाऱ्या बैठकीकडे आता सर्वांच लक्ष लागून राहील आहे.