अहमदनगर : श्रीगोंद्यात गोरक्षकांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हल्ल्यावेळी पोलिसांनीही बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप होतो आहे.


शनिवारी सकाळी काष्टीच्या बाजारातून कत्तलखान्यात जाणारा टेम्पो गोरक्षकांनी पकडून दिला होता. या टेम्पोत 12 जनावरं आढळून आली होती. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरु होतं. गुन्हा नोंदवून झाल्यानंतर गोरक्षक बाहेर येताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला.

या हल्ल्यात 8 गोरक्षक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींच्या डोक्याला, पायाला, पाठीला मारहाण झाली आहे. जखमी झालेले गोरक्षक हिंदू अघाडी आणि पुण्याच्या अखिल भारतीय कृषी गोसेवा संघाचे कार्यकर्ते असल्याची माहिती मिळते आहे.

दरम्यान, पोलीस ठाण्यासमोरच गोरक्षकांवर प्राणघातक हल्ला झाल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.