Sudha Murthy : महिलांवर अभद्र वक्तव्य करून सातत्याने चर्चेत असणारे संभाजी भिडे आणि सुधा मूर्ती यांची सांगलीत झालेल्या भेटीनंतर रामायण सुरुच आहे. सुधा मूर्ती आणि संभाजी भिडे यांच्या भेटीने कार्यक्रमाच्या आयोजक आणि शिवप्रतिष्ठानमध्ये वादाला तोंड फुटले आहे. सुधा मूर्ती आणि संभाजी भिडे यांच्या भेटीवरून गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावरही सातत्याने चर्चा होत आहे.
सुधा मूर्ती आणि भिडे यांच्या भेटीबाबत कार्यक्रमाचे आयोजक आणि शिवप्रतिष्ठानकडून वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत. मेहता पब्लिशिंग हाऊसच्या एका महिला कर्मचाऱ्याने भिडे आणि सुधा मूर्ती यांच्या भेटीबाबत फेसबुक पोस्ट केली होती. काही तासांनंतर ती पोस्ट डिलीट करण्यात आली. त्यानंतर शिवप्रतिष्ठानकडून फेसबुक पोस्ट करत संबंधित महिलेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे मेहता पब्लिशिंग या सगळ्या वादामध्ये काय भूमिका घेणार याकडे आता लक्ष लागले आहे.
जर, तुम्ही या कर्मचाऱ्यावर योग्यरित्या कारवाई केली नाही, तर महाराष्ट्रात पसरलेले लाखो धारकरी आणि वाचक तुमच्या प्रकाशनाच्या संपूर्ण प्रकाशनावर बहिष्कार करून तसेच कायदेशीर कारवाई करू. जर संबंधित कर्मचाऱ्यावर बडतर्फीची कारवाई न झाल्यास, नाईलाजाने आम्हाला सरकारकडे आपल्या प्रकाशनावर जाहीर बंदीची मागणी करावी लागेल, असे शिवप्रतिष्ठानने म्हटले आहे.
दुसरीकडे इन्फोसिस फाऊंडेशनच्या माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुधा मूर्ती यांनी मेहता पब्लिशिंग हाऊस आयोजित ‘संवाद लेखकाशी’ कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली होती. सांगलीतील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे हा कार्यक्रम झाला होता. यावेळी प्रसिद्ध अनुवादक लीना सोहोनी यांनी मूर्तीना त्यांच्या जीवनप्रवासावर आणि लेखनाबाबत बोलते केले.
अनेक बोधकथा, मिथक कथा आणि इतर साहित्याच्या माध्यमातून सुधा मूर्ती यांनी वाचकांच्या मनावर मोहिनी घातली आहे. इन्फोसिस फाऊंडेशनच्या माध्यमातून सुधा मूर्ती यांनी देवदासी कल्याणाचे काम सुरू केले. त्यांच्या या सामाजिक कार्याचा आवाका पुढे वाढतच गेला.
इतर महत्वाच्या बातम्या