रत्नागिरी : कोकणातील जिल्हा परिषद पंचायत समितीच्याच्या निवडणुकीत दापोली शिवसेनेत उभी फूट पडले. रामदास कदम आणि अनंत गीते विरुद्ध माजी आमदार सूर्यकांत दळवी या वादामुळे आज शिवसेनेच्या आठहून अधिक जणांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत भाजप आणि अपक्ष म्हणून आज उमेदवारी अर्ज दाखल केले.


दापोलीत आता शिवसेनेसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. गेले काही दिवस दापोली-मंडणगडमध्ये रामदास कदम आणि सूर्यकांत दळवी यांच्यातील वाद उघडपणे समोर आला होता.

रामदास कदम शिवसेना संपवायला निघाले आहेत. त्यांनी शिवसेनेला संपवायची सुपारीचा घेतली आहे, अशी उघड टीका शिवसेनेकडून पाच वेळा आमदार झालेल्या सूर्यकांत दळवी यांनी केली होती.

“आपण ‘मातोश्री’ला याची कल्पना दिली आहे. पण हे  त्यांच्या लक्षात येत नाही. या निवडणुकीच्या निकालानंतर ‘मातोश्री’च्या हे लक्षात येईल”, असं म्हणत आज सूर्यकांत दळवी यांनी रामदास कदम यांच्यावर पुन्हा निशाणा साधला.

“रामदास कदम बंडखोरांना पाठीशी घालत आहेत आणि रामदास कदमांच्या अशा बंडखोर उमेदवारांना आम्ही आता त्यांची जागा दाखवून देऊ”, असं म्हणत आज सूर्यकांत दळवी समर्थकांनी भाजप आणि अपक्ष म्हणून आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्याने रत्नागिरीत शिवसेनेत उभी फूट पडली आहे.