बीड : दिंवगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी स्वतःहून आपल्याला वेगळं केलं, या धनंजय मुंडे यांच्या आरोपांना ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. मुंडेसाहेबांनी स्वतः हून धनंजयला कधीही वेगळे केलं नाही, असा खुलासा त्यांनी एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत केला.

आपण या विषयावर जीवनात कधीही बोलले नाही, पण अबोल राहण्याचा लोक वेगळा अर्थ घेत आहेत. म्हणून आज बोलण्याची वेळ आली आहे, असं पंकजांनी सांगितलं. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी 'माझा कट्टा'वर गोपीनाथ मुंडे यांनी आपल्याला वेगळं केलं असं सांगितलं होतं.

''गोपीनाथ मुंडे यांचे बंधू आणि दिवंगत नेते पंडित अण्णा ज्यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले, त्या वेळी परळीत हत्तीवरून साखर वाटली होती. मुंडेसाहेब उप मुख्यमंत्री झाल्यानंतर साधी सायकल वरून सुद्धा साखर वाटली नाही'', असा आरोप पंकजांनी केला.

''धनंजयने पाहिल्यांदा टीव्हीवर लाईव्ह बोलताना साहेबांना सांगितल की आता आपलं काहीच नातं राहील नाही, त्या वर साहेब म्हणाले की, नातं असं मिटत नसतं. त्यामुळे माझी त्यांना नम्र विनंती आहे, साहेब आज आपल्यात नसताना असे आरोप करु नयेत'', असं पंकजा म्हणाल्या.



पंकजांनी शरद पवारांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचं अभिनंदनही केलं. पवार मुक्त पुणे ही घोषणा पुणे भाजपची आहे. आणि नगरपालिकेच्या निवडणुकीत असंच चित्र पाहायला मळालं. ही भारतीय जनता पार्टीने हाती घेतलेली एक मोहीम आहे, असंही पंकजांनी सांगितलं.

''मोदींकडून पवारांची स्तुती म्हणजे निवडणुकीव्यतिरिक्त दिलेला सन्मान''

पंतप्रधान हे एका पक्षाचे नसून देशाचे नेते आहेत. शरद पवारांचं स्थानही तेवढंच मोठं आहे. मोदी पवार यांचे चांगले संबंध असून मोदींनी पवारसाहेबांची स्तुती करणं म्हणजे निवडणुकी व्यतिरिक्त त्यांना दिलेला एक सन्मान आहे, असं पंकजा मुंडेंनी सांगितलं.

''परळी विरुद्ध परळी नाही, तर परळीविरुद्ध बारामती लढाई''

''परळी विरुद्ध परळी नसून हे परळी विरुद्ध बारामती असं युद्ध आहे. ऊसतोड कामगार महामंडळाचं काम गतीने झालं नाही. ऊसतोड कामगार महामंडळ बंद करून त्या लोकांना योग्य रोजगार मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत'', असं पंकजांनी सांगितलं.



"वेल किंवा झाड असल्याचा नाही, तर मी बाई असल्याचा प्रॉब्लेम''

''मी झाड किंवा वेलं नसून एक माणूस आहे. आणि महत्वाचा प्रॉब्लेम हा आहे, की बाई माणूस आहे. मला कोणतीच मर्यादा नसून पक्षाने कधीच माझ्यावर दबाव नाही आणला. माझा संघर्ष असाच सुरु राहावा, हीच इच्छा आहे, असं पंकजांनी सांगितलं.

''मुंडे साहेबांच्या काळात जादूच्या कांडीची आवश्यकता होती. मात्र आता पक्ष मोठा झाल्याने मी ही कांडी जनतेच्या हाती सोपवली आहे. तडजोडीचं राजकारण न करता विकासाचं राजकारण व्हायला हवं,'' असंही त्या म्हणाल्या.

काय आहेत धनंजय मुंडेंचे आरोप?

‘मुंडे साहेबांची साथ सोडण्याची माझी इच्छा नव्हती. भाजपमध्ये मी कार्यकर्ता म्हणून 10 वर्ष काम केलं होतं, त्यामुळे माझं नेतृत्व लादलेलं नाही.  पंकजा, प्रीतम मुंडे यांचं नेतृत्व लादलेलं आहे की नाही याबाबत मात्र, मी काहीही बोलणार नाही. विधानसभा निवडणुकीत माझा अवघ्या 20 हजार मतांनी पराभव झाला. याला मी काही पराभव मानत नाही.’ असं धनंजय मुंडे म्हणाले होते.



दुर्दैवाने पंकजासोबत काहीही नातं राहिलं नाही : धनंजय मुंडे

‘पंकजा मुंडेंसोबत आता काही नातं राहिलेलं नाही. हे दुर्दैव आहे. नातं व्हावं निखळ असावं अशी माझी इच्छा आहे. राजकारण वेगळं आणि नातं वेगळं. राजकारणात नातं आणू नये आणि नात्यात राजकारण या मताचा मी आहे. भाजप मी सोडलं नव्हतं. तर आम्हाला बाजूला सारण्यात आलं. भगवानगडावरुन मुंडेसाहेब म्हणाले होते की, आजपासून माझं माझ्या भावाशी असलेलं नातं संपलं. त्यानंतर माझ्या वडिलांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. म्हणून आम्ही भाजप सोडली.’ असा दावा धनंजय मुंडेंनी 'माझा कट्टा'वर केला होता.

माझा कट्टा :


संबंधित बातम्या : दुर्दैवानं, पंकजा मुंडेंसोबत काही नातं राहिलं नाही: धनंजय मुंडे